मानवाला अवकाशाविषयी आणि खगोलीय घटनांविषयी नेहमीच कुतूहल राहिलं आहे. कधीकाळी अंतराळ संशोधन, मोहिमा खूप दूरचं स्वप्न होतं. मात्र विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की हे स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. ब्रम्हांडात कितीतरी प्रकाशवर्ष दूर पाहता येणं शक्य झालं आहे. माणसाने पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडाचं निरीक्षणं करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या मोहिमांमुळे वैज्ञानिक ज्ञान मिळालं असलं, तरी त्यात अनेक गंभीर जोखमी आणि आव्हानं आहेत. जाणून घेऊयात त्यावरचा हा रिपोर्ट...
तांत्रिक अडचणी
अंतराळ संशोधनातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे तंत्रज्ञानाची अत्यंत गुंतागुंत. रॉकेट्स, अवकाशयानं आणि इतर उपकरणं अंतराळातील कठोर परिस्थितींना तोंड देण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक डिझाइन, निर्मिती, आणि चाचणी केलेली असतात. यातून ती प्रचंड तापमान, किरणोत्सर्ग, आणि सूक्ष्मगुरुत्वाकर्षणाचा सामना करू शकतील. कोणत्याही यंत्रणेतील बिघाड किंवा अपयश यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. नुकताच नासाचं स्टारलाईन यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पृथ्वीवर परतलं आहे. त्यामुळे सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकावर अडकून पडले आहेत.
१९७० मध्ये अपोलो १३ मोहिमेदरम्यान यानाच्या ऑक्सिजन टाकीचा स्फोट झाला, ज्यामुळे अवकाशयानाचं मोठं नुकसान झालं होतं. त्या मोहिमेतील अंतराळवीरांनी आपल्या अत्यंत हुशारीने परिस्थिती हातळली आणि सुखरूप पृथ्वीवर परत आले होते . पण काही घटनामंध्ये अतंरावीरांना जीवही गमवावा लागला आहे.
प्रक्षेपणाशी संबंधित जोखीम:
अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा टप्पा अत्यंत धोकादायक असतो. रॉकेट्स खूप ताकदवान असतात आणि कोणताही अनपेक्षित बदल किंवा घटना अपयशाला कारणीभूत ठरू शकते. अंतराळ संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात प्रक्षेपणाच्या अपघातांची शक्यता जास्त होती. १९८६ मधील चॅलेंजर आणि २००३ मधील कोलंबिया घटनेत संपूर्ण टीमचा मृत्यू झाला होता. ही जोखीम कमी करण्यासाठी अंतराळ संस्था आणि खासगी कंपन्यांनी काटेकोर सुरक्षा प्रोटोकॉल लागू केले आणि विस्तृत चाचण्या घेतल्या आहेत. तरी देखील अपघात होण्याची शक्यता कायम आहे.
पर्यावरणीय आव्हाने
अंतराळात पृथ्वीसारख वातावरण नाही, त्यामुळे पृथ्वीची कक्षा सोडल्यानंतर अत्यंत कठीण आणि धोकादायक बनत जातं. तापमान, किरणोत्सर्ग, आणि सूक्ष्मगुरुत्वाकर्षण अवकाशयान आणि अंतराळवीरांसाठी मोठं आव्हान निर्माण करतात. किरणोत्सर्गामुळे कॅन्सर आणि इतर आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता बळावते. ज्या अंतराळवीरांनी दीर्घ काळ अंतराळात घालवला आहे, त्यांना हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे आणि एकटेपणासारखे शारीरिक आणि मानसिक परिणाम जाणवू शकतात. या समस्यांवर मात करण्यासाठी सावधगिरी बाळगावी लागते आणि योग्य त्या उपाय योजना कराव्या लागतात.
मानसिक आव्हाने
अंतराळ संशोधन हे खूपच कठीण आणि तणावपूर्ण असते. अंतराळवीरांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असतं, कारण अंतराळ मोहिमेतील एकटेपणा, बंदिस्तपणा, आणि जोखमीची सतत असलेली भावना यांचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. या आव्हानांचा सामना करण्यासाठी अंतराळ संस्थांनी मानसिक स्क्रीनिंग आणि प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत, ज्यामुळे अंतराळवीरांना या तणावांना तोंड देण्यासाठी मदत मिळते. मात्र, दीर्घकाळाच्या अंतराळ मोहिमांचे मानसिक परिणाम हा अजूनही संशोधनाचा विषय आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य
या आव्हानांनंतरही अंतराळ संशोधनामुळे लोकांना एकत्र आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची क्षमता आहे. अनेक यशस्वी अंतराळ मोहिमा विविध देशांच्या सहकार्याने पार पडल्या आहेत. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हा संयुक्त प्रकल्प आहे, ज्यात अमेरिका, रशिया, युरोप, जपान, आणि कॅनडा यांचा सहभाग आहे. अनेक देश एकत्र येऊन आपल्या संसाधनांचा आणि तज्ञांचा वापर करून समान ध्येय साध्य करू शकतात. आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे शांतता आणि समज वाढण्यास मदत होते.
अंतराळ संशोधन हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक काम आहे. जोखीम मोठ्या असल्या तरी, त्याचे संभाव्य फायदे देखील तितकेच मोठे आहेत. तांत्रिक, पर्यावरणीय, मानसिक, आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांचा योग्य प्रकारे सामना करून, आपण अंतराळातील शोधमोहीमांमध्ये सातत्य ठेवू शकतो आणि ब्रह्मांडाच्या अधिक सखोल अभ्यासासाठी मार्ग मोकळा करू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.