Chandrayaan-3 Latest Updates: भारताच्या इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेने इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-3 ने बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. भारताच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. विक्रम लँडर चंद्रावर पोहचताच काही तासाच्या प्रतिक्षेनंतर लँडरमध्ये असणारं प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं. (Latest Marathi News)
प्रज्ञान रोव्हर बाहेर येताच इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, चांद्रयान-3 चंद्रावर पोहचल्यानंतर पुढील १४ दिवस इस्त्रोकडून चंद्राचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे या १४ दिवसात नेमकं काय होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. याबाबत इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
विक्रम लँडर चंद्रावर लँड झाल्यानंतर तिथे बरीच धूळ उडाली होती. ही धूळ खाली बसल्यानंतर हळू हळू प्रज्ञान रोव्हरला लँडरमधून बाहेर काढण्यात आलं. आता हे प्रज्ञान रोव्हर पुढील १४ दिवस चंद्रावरील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. ज्यातील ‘रंभा एलपी’ नावाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील आयन्स आणि इलेक्ट्रॉन्सचे मापण करेल.
थर्मो फिजिकल उपकरण दक्षिण ध्रुवावरील तापमानातील बदल अभ्यासेल. तसेच चंद्रावरील भूकंपाचे मापन करणारे उपकरणही याच काळात कार्यान्वित होईल. प्रज्ञान बग्गीमधील एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या मातीची रासायनिक अवस्था स्पष्ट करेल, तर लेझर स्पेक्ट्रोमीटर चंद्राच्या मातीतील खनिजांची माहिती देईल.
प्रज्ञान रोवर चंद्रावरील पणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अद्यापही सूर्यप्रकाश पडलेला नसून अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोवरसाठी ऐतिहासिक असेल. रोवरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली सर्व माहिती रोवर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या घटकांची उपस्थिती शोधण्यात येईल. चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक कामगिरीमुळे स्पेस सायन्समध्ये भारताचे मोठे योगदान असेल.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.