Mamata Banerjee Meets PM Modi in Delhi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज, शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. जवळपास ४५ मिनिटे ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? या भेटीमागचा अर्थ काय? याबाबत अनेक तर्कवितर्क आता लढवले जात आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीतील पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ममता बॅनर्जींनी त्यांची भेट झाली. जवळपास ४५ मिनिटे त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्या. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता आणि मोदी यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने या भेटीवर शंका उपस्थित करतानाच जोरदार निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात सीबीआय आणि ईडी कारवाई सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौरा मॅच फिक्सिंगचा भाग आहे, अशी टीका होत आहे.
चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यात जीएसटी थकबाकी, मनरेगासह अनेक मुद्द्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. जीएसटीच्या थकबाकीबाबत पश्चिम बंगाल सरकार बऱ्याच महिन्यांपासून केंद्राकडे मागणी करत आहे.
दुसरीकडे, ईडीच्या कारवाईच्या फेऱ्यात ममता सरकारमधील दिग्गज नेते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते पार्थ चटर्जी अडकले आहेत. राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्यावरून ममता सरकार चहुबाजूने घेरलेले आहे. तर याच प्रकरणात पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी हिलाही अटक करण्यात आली आहे. अशा वेळी ममता बॅनर्जी आणि मोदी यांची भेट झाल्याने विरोधकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
काँग्रेस आणि माकपने या भेटीवर टीकास्त्र सोडताना हा मॅच फिक्सिंगचा भाग असल्याचे म्हटले आहे. तर मेघालयचे माजी राज्यपाल आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथागत रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला देताना, ममता बॅनर्जींसोबतची बैठक ही कोणतीही सीक्रेट अंडरस्टँडिंग नाही हे त्यांनी देशातील जनतेला समजावून सांगायला हवं, असा टोला लगावला आहे.
२०१६ पासून सुरू आहे मॅच फिक्सिंग - काँग्रेस
पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी भेटीवरून काँग्रेससह अन्य पक्षांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रवक्ता रिट्जू घोषाल यांनीही टीका केली आहे. ही मॅच फिक्सिंग सन २०१६ पासून बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यावर विरोधकांकडून करण्यात आलेले मॅच फिक्सिंगचे आरोप तथ्यहीन आहेत, असे तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.