Karnataka Election Result 2023: सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. प्राथामिक कलानुसार कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. तर सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत आहे. केंद्रातील मोदी सरकारने कर्नाटक विधानसभा काबीज करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावून दिली होती. मात्र, तरी सुद्धा कर्नाटकात भाजप सत्ता राखून ठेवण्यास अपयशी ठरलं. (Latest Marathi News)
कर्नाटक विधानसभेची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची होती. कारण, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या राज्यात कोणाचे सरकार येणार याची बरीच चर्चा होती. मात्र, कर्नाटकातील पराभवामुळे भाजपच्या दक्षिण मिशनला मोठा धक्का बसला आहे. दक्षिणेत फक्त याच राज्यात भाजपचे सरकार होते. आता ते राज्य सुद्धा भाजपच्या हातातून गेलं आहे.
विशेष बाब म्हणजे या वर्षी तेलंगणात निवडणुका आहेत. भाजपने या निवडणुकीची अनेक दिवसांपासून तयारी केली होती. मात्र कर्नाटकातील पराभवानंतर त्यांचे आव्हान आणखी वाढले आहे. जर भाजपने कर्नाटकात विजय मिळवला असता, तर त्यांना तेलंगणा निवडणुकीच्या रिंगणात पूर्णपणे जोमाने उतरता आलं असतं.
तेलंगणात भाजप आणि केसीआर यांचा पक्ष बीआरएस यांच्यात लढत पाहायला मिळत होती. मात्र कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर कदाचित तसे होणार नाही. याची झलक प्रियांका गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या वेळीच काँग्रेसच्या वतीने दिली होती. यंदा ४ राज्यांमध्ये निवडणुका होणार असून कर्नाटकात भाजपच्या दारुण पराभवानंतर विरोधी पक्षांना विशेषतः काँग्रेसला भाजपला टार्गेट करण्याची संधी मिळाली आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसभेच्या सुमारे १२९ जागा असून यापैकी भाजपकडे केवळ २९ जागा आहेत. विशेष बाब म्हणजे या २९ जागांपैकी २५ जागा एकट्या कर्नाटकातील आहेत. जिथे विधानसभेत भाजपचा पराभव झाला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकून दक्षिणेकडील राज्यांमधील १२९ लोकसभा जागांपैकी जास्तीत जास्त जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याला आता सुरूंग लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी भाजप दक्षिणेतील कर्नाटक आणि तेलंगणना निवडणुकीला जास्त गांभिर्याने घेत नव्हता. मात्र, आगामी २०२४ लोकसभा निवडणूकीत या राज्यातील जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा काबीज करण्यासाठी भाजपने दक्षिण मिशन सुरू केलं आहे. त्यामुळे भाजप कर्नाटकसह दक्षिणेतील इतर राज्यांसाठीही रणनीती आखण्यात गुंतला आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दक्षिणेत कमळ फुलण्यासाठी वातावरण अनुकूल आहे की नाही, याचे संकेत भाजपला मिळतील, असे मानले जात होते. आता कर्नाटक हातातून गेल्यानंतर हे संकेत भाजपला नक्कीच मिळाले असेल. कर्नाटकातील पराभवानंतर आता भाजप तेलंगणा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करेल, पण ते त्यांच्यासाठी सोपं नसणार आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.