
हल्लीच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरून अनेक प्रेमकथा सुरू होतात. फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मने अनेकांचे नाते जोडले आहे. असंच काही झालं आहे जॅकलीन फोरेरो आणि चंदनसोबत. अमेरिकेच्या जॅकलीनने एका साधारण इंस्टाग्राम मेसेज 'Hello' पासून आपली प्रेमकहाणी सुरू केली. आता त्या दोघांनीही मनाची पूर्ण तयारी करून लग्नाचा निर्णय घेतला आहे. चंदन हा भारतातील आंध्र प्रदेशमधील एका छोट्या गावात राहतो. आता त्या ठिकाणी आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात करण्यासाठी जॅकलीन तिथे पोहचली आहे.
इंस्टाग्रामवर झालं प्रेम
अमेरिकेत राहणारी जॅकलिन व्यवसायाने छायाचित्रकार आहे. एकेदिवशी तिने चंदनची इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिली आणि त्याच्या साधेपणा, देवाप्रती असलेल्या भक्तीमुळे त्याच्याकडे आकर्षित झाली. जॅकलिनने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये चंदनसोबतच्या पहिल्या संभाषणाबद्दल सांगितले की, "मी पहिल्यांदा चंदनला मेसेज केला आणि त्याचे प्रोफाइल पाहिल्यानंतर मला वाटले की तो एक उत्साही ख्रिश्चन आहे ज्याला धर्मशास्त्रात रस आहे."
जॅकलिन पुढे सांगते की, त्या दिवशीचा एक साधा मेसेज हळूहळू एका मनोरंजक आणि विशेष अशा संभाषणात परिवर्तित झाला. त्या संभाषणातून त्यांची जवळीक वाढत गेली आणि फक्त १४ महिन्यांतच त्यांचं प्रेम इतकं खुललं की ते एकमेकांशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नव्हते.
वयात फरक असूनही प्रेमात विश्वास होता
जॅकलिन आणि चंदन यांच्या नात्याबद्दल समाजात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांनी त्यांच्या नात्याची चेष्टा केली, तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या वयात ९ वर्षांचा फरक आहे. तरीही, या वयाच्या फरकाचा त्यांच्या नात्यावर काहीही परिणाम झाला नाही.
जॅकलिनला सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या. काही सकारात्मक, काही नकारात्मक. तिला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला. तरीही तिने नात्यावर विश्वास ठेवला आणि खंबीर राहिली. दोघांना आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता.जॅकलिन म्हणते की नातं खरं असेल तर देव नक्की एकत्र आणतो. त्यांनी समाजाच्या मतांना न जुमानता एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
आईच्या संमतीनंतर भारतात आली
ही सुंदर प्रेमकथा एका अनोख्या वळणावर आली जेव्हा जॅकलिनच्या आईने त्यांचं नातं पूर्णपणे स्वीकारलं. आईकडून संमती मिळाल्यानंतर, जॅकलिन आणि तिची आई भारतात चंदनला भेटण्यासाठी निघाल्या. जॅकलिनने सांगितलं, "आठ महिने ऑनलाईन डेटिंग केल्यानंतर आणि आईच्या पूर्ण संमतीने, आम्ही भारतात आलो आणि तो अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला."
नवीन आयुष्याच्या सुरुवातीची तयारी
आता हे जोडपे भारतात त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. जॅकलिन आणि चंदन यांनी एक यूट्यूब चॅनेल सुरू केला आहे, ज्यावर ते त्यांच्या प्रेमकथेचे तसेच एकमेकांसोबत घालवलेल्या खास आणि आनंददायी क्षणांचे व्हिडिओ शेअर करतात. जॅकलिनने आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे, "आमच्या प्रेमकथेवर खूप टीका झाली आहे, पण देवाने प्रत्येक पावलावर आमच्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. आता आपण एका नवीन सुरुवातीसाठी सज्ज आहोत."
लग्नाचे स्वप्न आणि चंदनचा व्हिसा
जोडप्याने आता अमेरिकेत त्यांचे नवीन जीवन सुरू करण्यासाठी चंदन व्हिसासाठी अर्ज केला आहे. जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, "हा आमच्यासाठी एक नवीन अध्याय आहे आणि आम्ही या प्रवासासाठी खूप उत्साहित आहोत."
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.