इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीवर शेकडो क्षेपणास्त्र डागून हजारो इस्रायल नागरिकांचे प्राण घेतले आहेत. तर, त्या प्रत्युत्तरात इस्रायलनेही हल्ले चढवल्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांचाही जीव गेला आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, या दोन्ही देशांमधील युद्धात असंख्य भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून २१२ भारतीयांना घेऊन पहिल्या विमानाने गुरुवारी रात्री भारताच्या दिशेने उड्डाण भरले.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हे विमान दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण २१२ भारतीयांचा समावेश आहे. मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला असून मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. खरं तर, ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली होती.
त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. त्यासाठी गुरुवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.
त्यांना परत आणले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार इस्रायलमधून ज्या लोकांना आणत आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही. दरम्यान, भारतात येणार्या विमानांमध्ये चढण्यासाठी इस्रायलमधील तेल अवीव विमानतळावर भारतीयांनी गर्दी केली आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इस्रायलमध्ये शिकणाऱ्या शुभम कुमार या विद्यार्थ्याने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून बहुतांश भारतीय विद्यार्थी घाबरले होते. पण भारतीय दूतावासाने काही सूचना जारी केल्या. यामुळे आमचे मनोबल वाढले आणि आम्हाला परत येण्याची परवानगी मिळाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.