
इराणमध्ये बलूचिस्तानच्या नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जात आहे. या वाढत्या घटनांकडं जगभरातील मानवाधिकार संघटनांचे लक्ष वेधले गेले आहे. अवघ्या महिनाभरात इराणमध्ये बलूचिस्तानच्या ३३ कैद्यांना फासावर लटकावण्यात आलं आहे. या कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा देताना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली नाही, असा दावा केला जात आहे. या कैद्यांना बचावाची एकही संधी न देताना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे, असं सांगण्यात येत आहे.
बलूचिस्तानमध्ये मानवाधिकार उल्लंघन आणि इराणमध्ये बलूच कैद्यांना फासावर लटकावण्याच्या वाढत्या घटनांमुळं मानवाधिकार संघटनांची चिंता वाढवली आहे. संघटनांच्या रिपोर्टनुसार, मागील वर्षी एप्रिलमध्ये म्हणजेच महिनाभरातच किमान ३३ बलूच कैद्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
देशातील वेगवेगळ्या १० कारागृहांमध्ये कैद्यांना फासावर लटकावण्यात आलं. बलूच अॅक्टिव्हिस्ट कॅम्पेनच्या एका अहवालानुसार, ही मृत्युदंडाची शिक्षा कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता आणि संबंधितांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता देण्यात आली आहे, असा दावा केला जात आहे. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई हे टीकेचे धनी ठरले आहेत.
आणखी ८५ कैद्यांच्या फाशीची तयारी
रिपोर्टनुसार, इराणचं सरकार बलूच नागरिकांना राजकीय हेतूने प्रेरित आरोपांतून लक्ष्य करत आहेत. या वर्षीच्या अखेरीपर्यंत जाहिदान मध्यवर्ती कारागृहात आणखी ८५ बलूच कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. बलूच नागरिकांची संख्या इराणच्या एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के इतकीच आहे.
इराणचं सरकार बलूच नागरिकांना लक्ष्य करत आहे. चुकीच्या आणि राजकीय हेतूने झालेल्या आरोपांमध्ये अडकवलं जात आहे, असं बलूच अॅक्टिव्हिस्ट कॅम्पेनच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. ज्या बलूच कैद्यांना फाशीची शिक्षा झाली आहे, त्यांच्यावर राजकीय घटना, अंमली पदार्थ तस्करीसंबंधी गुन्हे, हत्या यांसारखे आरोप होते. अनेक जणांना त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही पूर्वसूचना न देताच, फाशीची शिक्षा दिली गेली आहे. हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मापदंडाचे सर्रास उल्लंघन आहे, असा आरोप केला जात आहे.
रिपोर्टमध्ये इराणच्या जाहिदान मध्यवर्ती कारागृहातील परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ते इराणच्या कुप्रसिद्ध तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगातील कैद्यांचं शोषण केले जात असल्याचे अनेक अहवाल समोर आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.