

जम्मू-काश्मीरमध्ये ३० ते ३५ दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती
चिल्लई कलानदरम्यान भारतीय सैन्याची विशेष ‘विंटर डॉक्ट्रिन’ मोहीम
बर्फवृष्टी आणि शून्याखालील तापमानातही शोध कार्य सुरू
जम्मू आणि काश्मीरमध्ये 'चिल्लई कलान' (२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी) या ४० दिवसांत सर्वात कडक हिवाळा असतो. याच हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात एक नवीन 'विंटर डॉक्ट्रिन' मोहीम सुरू केलीय. हिमवर्षाव, दुर्गम पर्वतीय प्रदेश आणि शून्याखालील तापमान असताना दहशतवादी फायदा घेत घुसखोरी करतात. त्यामुळे लष्कराकडून शोध राबवली जात आहे.
चिल्लई कलान दरम्यान मुसळधार बर्फवृष्टी आणि रस्ते बंद असल्याने दहशतवादी कारवाया होत नसतात. पण यावेळी सैन्याने आपली रणनीती बदललीय. हिवाळ्यातही आक्रमक भूमिका स्वीकारलीय. सूत्रांचे म्हणणे आहे की, बर्फाळ भागातही तात्पुरते तळ आणि पाळत ठेवणाऱ्या चौक्या उभारून लष्कराने सतत दबाव कायम ठेवला आहे. चिल्लई कलान भागातील हिवाळा आणि मुसळधार बर्फवृष्टी दरम्यान भारतीय सैन्याने किश्तवाड आणि दोडा जिल्ह्यांमध्ये दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्यात.
दहशतवाद्यांना सुरक्षित लपण्याची जागा मिळू नये म्हणून लष्कराचे जवान अत्यंत कठीण परिस्थितीत आणि मर्यादित दृश्यमानतेसह उंच टेकड्या, दऱ्या आणि जंगलांमध्ये नियमितपणे गस्त घालत असतात. सूत्रांनुसार जम्मू प्रदेशात अंदाजे ३० ते ३५ पाकिस्तानी दहशतवादी लपल्याचा संशय आहे. दरम्यान सततच्या दबावामुळे या दहशतवाद्यांना आता लोकवस्तीच्या क्षेत्रांपासून दूर उंचावर आणि एकाकी भागात आश्रय घ्यावा लागतोय. काही दहशतवादी स्थानिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जातोय.
परंतु त्यांना आता पूर्वीसारखा स्थानिक पाठिंबा मिळत नसल्याचं सांगितलं जात आहे. या शोध मोहिमेत जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, एसओजी, वन विभाग आणि ग्राम संरक्षण रक्षकांकडून लष्कराला पाठिंबा मिळतोय. सर्व एजन्सींमधील समन्वय आणि गुप्तचर यंत्रणेच्या आधारे मिळालेली माहिती यावरून संयुक्त कारवाई केली जातेय. सैन्यदलाने हिवाळी भागात विशेष प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले आहेत. चोवीस तास देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन, थर्मल इमेजिंग कॅमेरे आणि आधुनिक उपकरणे वापरली जात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.