प्रमोद जगताप, दिल्ली| ता. २२ डिसेंबर २०२३
संसदेमधून खासदारांचं निलंबन केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. या निलंबनाच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने काल संसद भवन ते विजय चौक असा मोर्चा काढला. त्यानंतर आज इंडिया आघाडीच्या वतीने जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार, राहुल गांधींनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
शरद पवारांची टीका...
या सभेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासदार निलंबनावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "देशातील मतदारांनी निवडून दिलेल्या लोकांवर सरकारने कारवाई केली. देशाच्या संसदेतील खासदारांना निलंबित केलं याची किंमत मोदी सरकारला मोजावी लागेल. हा मुद्दा गावागावात पोहोचला पाहिजे. हल्ला करणाऱ्यांना पास देणारे संसदेत बसले आहेत, आणि प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना निलंबित केले.." असे शरद पवार यावेळी म्हणाले.
राहुल गांधींचा हल्लाबोल...
"काही दिवसांपूर्वी संसदेत जे घडल ते सगळ्यांनी पाहिले. यावेळी भाजप (BJP) खासदार सभागृहातून पळून गेले. जे देशभक्त म्हणतात त्यांची हवा निघून गेली," असे म्हणत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. या तरुणांनी घुसखोरी करण्याचे बेरोजगारी हेच कारण होते, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
६० टक्के मतदारांचे तोंड बंद केले...
"देशातील मीडिया खासदारांना बाहेर काढल्याचा प्रश्न विचारत नाही पण राहुल गांधी यांनी मोबाईल वर बनवलेला व्हिडिओ मात्र दाखवला. निलंबनाच्या कारवाईतून देशातील 60 टक्के मतदारांच तोंड बंद केले आहे. मोदी तुम्ही देशाला, देशातील युवकांना समजू शकले नाही.." असा टोला राहुल गांधींनी लगावला.
द्वेषाविरुद्ध प्रेमाची लढाई!
तसेच "आम्ही सगळे विरोधी पक्ष, विरोधी पक्षाचे नेते सोबत उभे आहोत. ही लढाई द्वेष आणि प्रेमाची आहे. तुम्ही कितीही द्वेष पसरावा आम्ही प्रेमाने देशातील लोकांना जिंकत राहू.." असा विश्वासही राहुल गांधींनी व्यक्त केला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.