नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून भारतात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) शिगेला पोहोचलेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. दरम्यान, संसर्गाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी त्यांच्या सक्रिय रुग्ण संख्येमध्ये (Corona Active Cases) घट नोंदवण्यास सुरुवात केली आहे (ICMR Says Corona Third Wave May End By March).
भारतातील सक्रिय (COVID-19) संख्या आता 14.35 लाखांपर्यंत घसरली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे.
आयसीएमआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या महिन्याच्या अखेरीस नवीन रुग्णांची संख्या मूळ पातळीपर्यंत खाली येईल. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले की, महामारीची तिसरी लाट मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसर्या आठवड्यात संपुष्टात येऊ शकते.
मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये संसर्गाची संख्या कमी होत चालली आहे. तरीही रुग्णांची संख्या दररोज सुमारे 15,000 पर्यंत घसरली आहे, जी काही आठवड्यांपूर्वी 48,000 रुग्ण प्रति दिवस होती.
महाराष्ट्रात निर्बंध शिथिल केले जातील - राजेश टोपे
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी सांगितले की, सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही, परंतु येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी करेल. दोन दिवसांपूर्वी, राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली. काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात आणखी शिथिल केले जाईल.
12-15 वयोगटातील बालकांच्या लसीकरणावर भर
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,252 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी या संसर्गामुळे 75 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात ओमिक्रॉन प्रकाराचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत राज्यात एकूण 3,334 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
ताज्या आकडेवारीनंतर आता राज्यात एकूण 77,68,800 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,42,859 जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 12 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु करण्याची मागणीही टोपे यांनी केली. केंद्राने 12 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरणाची प्रक्रिया सुरु करावी. त्यांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आरोग्य पायाभूत सुविधांसह सज्ज आहे, असंही सांगण्यात आलं आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.