IAS Ranu Sahu Arrested in Coal Scam : छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) सर्वात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शनिवारी आयएएस अधिकारी रानू साहू यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना तीन दिवसांची कोठडी दिली आहे.
रानू साहू यांना ईडीकडून २५ जुलै रोजी पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीदरम्यान छत्तीसगडमध्ये आयएएस अधिकारी, काँग्रेसचा एक नेता आणि हवाला ऑपरेटरांच्या ठिकाणांवर शुक्रवारी छापेमारी केली होती.
ईडीने आयएएस अधिकारी रानू साहू, काही अन्य सरकारी अधिकारी आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधील नेते रामगोपाल अग्रवाल, काही ठेकेदार आणि हवाला डीलरच्या रामपूर आणि अन्य शहरांमधील जवळपास १५ हून अधिक ठिकाणांवर झाडाझडती घेतली होती.
रायगढच्या जिल्हाधिकारीपदी असलेल्या रानू साहू सध्या कृषी विभागाच्या संचालकपदी आहेत. कथित कोळसा घोटाळा प्रकरणात चौकशी करताना ईडीने काही दिवसांपूर्वी साहू यांच्या ठिकाणांवर छापेमारी करून त्यांची संपत्ती जप्त केली होती. रायपूरमध्ये आयएएस अधिकारी साहू आणि अग्रवाल, प्रभाकर पांडे यांच्या घरांबाहेर निमलष्करी दलाचे जवान तैनात केले होते.
ईडीकडून अटक करण्यात आलेल्या रानू साहू या छत्तीसगडमधील दुसऱ्या आयएएस अधिकारी आहेत. याआधी ईडीने आयएएस अधिकारी समीर विश्नोई यांना अटक केली होती. छत्तीसगडमध्ये बऱ्याच वर्षांपासून कोळसा घोटाळ्याचा तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीएमएलए अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, छापेमारी का करण्यात येत आहे, हे तपास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले नाही.
दुसरीकडे दारू घोटाळा प्रकरणातही राज्यात ईडीकडून तपास सुरू आहे. ठिकाठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. दारू घोटाळा प्रकरणात ईडीने रायपूरमधून अन्वर ढेबरला अटक केली आहे. रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचे ते बंधू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.