हरियाणामध्ये तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी ५ गौरक्षकांना पोलिसांनी अटक केली. दिल्ली-आग्रा महामार्गावर २७ किलोमीटरपर्यंत तरुणाचा पाठलाग करत गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी गोरक्षणासाठी समर्पित संस्था चालवणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली.
फरिदाबादमधील एनआयटी कॉलनीमध्ये राहणाऱ्या आर्यन मिश्रा या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आर्यन आपल्या चार मित्रांसोबत रात्री उशिरा नूडल्स आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. पण तो घरी परत आलाच नाही. कारने हे सर्व मित्र नूडल्स आणायला जात होते. हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा तब्बल २७ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्या कारवर गोळीबार केला. यामधील एक गोळी आर्यनला लागली.
ही घटना 23 ऑगस्ट रोजी घडली. रात्रीच्या वेळी आरोपी गोरक्षकांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, डस्टर आणि फॉर्च्युनर कारमधून काही गुरे तस्कर शहरात रेकी करत आहेत. या माहितीनंतर आरोपींनी जनावरांची तस्करी करणाऱ्यांचा त्या कारचा शोध सुरू केला. यावेळी त्यांना पटेल चौकात एक डस्टर कार दिसली. आरोपींनी कार चालकाला थांबण्यास सांगितले.
कार चालक हर्षित आणि त्याचा शेजारी असलेल्या सांकी यांचे एनआयटी क्रमांक एकचे रहिवासी पुलकित भाटिया, पियुष भाटिया आणि भुरी यांच्याशी पूर्वीपासूनच वैर असल्याने त्यांनी कार थांबवली नाही. १४ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यातही सांकी आरोपी आहे. अशा स्थितीत कार चालक हर्षितला वाटले की एकतर पुलकित भाटियाने आपल्याला मारण्यासाठी लोकांना पाठवले आहे किंवा पोलिस साध्या वेशात त्याला पकडण्यासाठी आले आहेत.
या भीतीने हर्षितने कारचा वेग वाढवला. त्यामुळे गोरक्षकांनी त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला आणि कार थांबवण्यासाठी गोळीबार सुरूच ठेवला. महामार्गावरील गडपुरी टोलनाक्यावर आरोपींनी कार थांबवण्यासाठी मागून गोळी झाडली. ज्यामुळे कारची मागील काच फुटली आणि चालकाच्या शेजारी बसलेल्या आर्यन मिश्राला गोळी लागली. त्यानंतर कारचालक हर्षितने कार थांबवली. त्यानंतर आरोपीने आर्यनच्या छातीत दुसरी गोळी झाडली. जखमी झालेल्या आर्यनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २४ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्या मृत्यू झाला.
या हत्याकांड प्रकरणी हरयाणा पोलिसांनी ५ जणांना अटक केली. त्यापैकी अनिल कौशिक हे लिव्ह फॉर नेशनचे संस्थापक अध्यक्ष होते. ही संस्था गायींच्या संरक्षणासाठी काम करते आणि रुग्णवाहिका चालवते. अनिल कौशकचे त्याच नावाने फेसबुक पेज देखील आहे. हत्या करण्यात आलेला आर्यन हा ओपन स्कूलिंगद्वारे १२वीचे शिक्षण घेत होता. आर्यन आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मोबाईल रिपेअरिंगचे काम करायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.