
Gujarat Accident : गुजरातमधील भावनगर येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने भरधाव वेगाने कार चालवत रस्त्यावरुन जाणाऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि दोघे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भावनगरमधील कालियाबीड परिसरातील भगवती सर्कल-शक्ती माताजी मंदिर या दरम्यान गुरुवारी (१७ जुलै) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक अनिरुद्धसिंह गोहिल यांचा मुलगा हर्षराजसिंह गोहिल हा कार चालवत होता. हर्ष त्याच्या मित्राशी स्पर्धा करत कार वेगाने चालवत होता. त्याने रस्त्यात चालत असताना पादचाऱ्यांना धडक मारली. यात भार्गव भट्टी आणि चंपा वाचानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
भावनगरमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करणारा भार्गव भट्टी त्याच्या मित्रांसोबत रस्त्याच्या कडेला उभा होता. तेव्हा हर्षच्या कारने त्याला आणि आणखी तिघांना धडक मारली. अपघातात भार्गवचा जागीच मृत्यू झाला. उरलेल्या तीन जखमींना सर टी जनरल रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. उपचार सुरु असताना चंपा वाचानी यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये १२०-१५० किमीच्या वेगाने एक कार काहीजणांना धडक मारुन पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने निष्काळजीपणा दाखवत वेगाने कार चालवली आणि रस्त्यावरील लोकांना धडक मारली. सुरुवातीला आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण पुढे अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपी तरुणावर कलम १०६ (सदोष मनुष्यवध) यासह अन्य कलम समाविष्ट करण्याची न्यायालयासमोर विनंती केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.