मुसळधार पाऊस आणि भूस्खलनांमुळे काश्मीर व जम्मूमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे.
झेलमसह सर्व प्रमुख नद्यांच्या पातळी वाढल्याने NH‑44 महामार्ग पूर्णपणे बंद आहे.
शाळा व महाविद्यालये सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत.
प्रशासनाने आपत्कालीन हेल्पलाइन, NDRF व लष्कर तैनात करून मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे.
काश्मीर आणि जम्मू प्रदेशात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. सततच्या पावसामुळे झेलमसह सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या सीमेजवळ पोहोचली आहे. यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग (NH-44) वाहनांसाठी बंद करण्यात आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन आणि दगड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या भागात मुसळधार पाऊस आणि पूराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, तर हवामान विभागाने पुढील २४ तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
परिस्थितीचा गंभीर विचार करून काश्मीर खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये तात्पुरत्या बंद ठेवण्यात आली आहेत. झेलम आणि तिच्या उपनद्यांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये पाण्याची पातळी तीन फूट वाढल्याचे नोंदवले गेले आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी श्रीनगर पोलिसांनी आपत्कालीन हेल्पलाइन सेवा सुरू केली असून, नागरिकांनी कोणत्याही संकट किंवा आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाइन क्रमांकांवर थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर रेल्वेकडून देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जम्मू आणि कटरा स्थानकांवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या ६८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २६ ऑगस्टपासून मुसळधार पावसामुळे पठाणकोट-जम्मू रेल्वे मार्गाचे नुकसान झाले असून गेल्या आठ दिवसांपासून जम्मू रेल्वे विभागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जम्मू आणि कटरा दरम्यान तीन शटल ट्रेनची सेवा सुरू करण्यात आली आहे, परंतु परिस्थिती अजूनही नियंत्रणाखाली नाही.
कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला यामुळे आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवार पर्यंत जम्मू प्रदेशात सर्वाधिक ३८० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. किश्तवारमध्ये प्रसिद्ध मुघल मैदान पाण्याखाली गेले असून ते पहिल्यांदाच तलावात रूपांतरित झाले आहे. भूस्खलनामुळे चेरजी-किश्तवार रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे, तर काश्मीर खोऱ्याच्या वरच्या भागात, विशेषतः जोजिला पास आणि कारगिलच्या उंच भागात हलक्या बर्फवृष्टीची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने इशारा दिला आहे की, येत्या काही तासांत अनंतनाग, शोपियान आणि कुलगाममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच काही भागात अचानक पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सर्व संबंधित विभाग हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. भारतीय लष्कर, एनडीआरएफ आणि पोलिस पथके अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी, मदत पुरवण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत.
राजोरी जिल्ह्यातील सुंदरबनी तहसीलमध्ये घर कोसळून एका आई आणि मुलीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कठुआ जिल्ह्यातील रणजित सागर धरणाची पाण्याची पातळी धोक्याची पातळी गाठली आहे आणि दुपारनंतर ती ओलांडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.