Kanjhawala death case : दिल्लीतील कंझावाला प्रकरणात पोलीस तपासात नवी माहिती समोर आली आहे. घटना घडली त्या रात्री पीडित तरुणीच्या सोबत स्कुटीवर आणखी एक मुलगी होती. घटनेनंतर ती मुलगीही जखमी झाली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुसऱ्या मुलीनं हा अपघात असल्याची माहिती दिली आहे. आज, मंगळवारी तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दोन्ही तरूणी एका हॉटेलात बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या स्कुटीवरून परतत होत्या. (Delhi News)
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरूणी स्कुटी चालवत होती. तर दुसरी मुलगी तिच्या पाठीमागे बसली होती. अपघात झाला त्यावेळी पाठीमागे बसलेली मुलगी जखमी झाली. ती आपल्या घरी गेली. ही घटना शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली होती.
दिल्लीच्या सुलतानपुरी कंझावाला परिसरात कारने एका तरुणीला १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. या कारमध्ये पाच जण होते. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांना तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला. पोलिसांनी कारवाई करून पाचही तरुणांना ताब्यात घेतले आहे. तसेच कार जप्त केली आहे.
पीडितेच्या घराजवळ पोलीस तैनात
पीडित तरुणीचे घर अमन विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करण विहारमध्ये आहे. त्या ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. पीडितेचं संपूर्ण कुटुंबीय मामाच्या घरी आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेत होते. ते सर्व जण मुरथल सोनीपतहून आपल्या घरी मंगोलपुरीकडे परतत होते. त्याचवेळी स्कुटीवरून घरी परतणाऱ्या तरुणीचा अपघात झाला. तरुणी कारच्या खाली अडकली. आरोपी तरुणांनी तिला १२ किलोमीटर फरफटत नेले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फॉरेन्सिक पथकाने तपास केला आहे. कारच्या खाली आणि मध्यभागी रक्ताचे डाग दिसून आले आहेत. तर कारच्या आतमध्ये कोणताही पुरावा सापडलेला नाही.
आणखी एक व्हिडिओ समोर
दरम्यान, या घटनेच्या १५ मिनिटांआधीचा व्हिडिओ समोर आला आहे. रात्री साधारण पावणेदोन वाजता एका हॉटेलातून पार्टी करून तरूणी बाहेर येताना दिसत आहे. तिची मैत्रीण आधी स्कुटी चालवत होती. पण काही अंतरावर गेल्यानंतर तरुणी स्वतः स्कुटी चालवत असल्याचे दिसते. तिची मैत्रीण पाठीमागे बसते. त्यानंतर हा अपघात झाला आहे. तरुणीचा पाय कारमध्ये अडकला आणि ती कारसोबत फरफटत गेली, असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.