Delhi News: देशाची राजधानी दिल्लीला पूराने (Delhi Flood) वेढा घातला आहे. यमुना नदीला पूर (Delhi Yamuna River Flood) आला आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूराचे पाणी नदीकाठी राहणाऱ्या लोकवस्तीमध्ये शिरले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. या पूरामुळे दिल्लीतील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.
दिल्लीतल्या यमुना नदीने तब्बल ४५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. या नदीची पाणी पातळी २०८ मीटरवर पोहचली आहे. यापूर्वी १९७८ साली यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना घरं सोडण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे यमुना नदीला पूर आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून यमुना नदीपात्रात मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पूरामुळे दिल्लीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक वाहनं वाहून गेली आहेत. दिल्ली पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढू नये यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, 'शक्य असल्यास हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून मर्यादित प्रमाणात पाणी सोडा.'
दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर असलेल्या लोकवस्तीमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे त्यांचे संसारउपयोगी वस्तू देखील वाहून गेल्या आहेत. या पूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. पूरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत.
पूरस्थिती लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी पूरग्रस्त भागामध्ये कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिल्यामुळे पूरग्रस्त परिसरात एकाच ठिकाणी चारपेक्षा जास्त लोकं एकत्र येऊ शकत नाहीत. नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री, उपराज्यपाल आणि डीडीएमए यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दिल्लीतील शाळा १६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.