दिल्ली, ता. १९ मे २०२४
एकीकडे लोकसभेचा रणसंग्राम सुरू असतानाच आप खासदार स्वाती मालीवाल यांनी केलेल्या मारहाणीच्या आरोपावरुन दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यालयात येतो, कोणाला अटक करायची ते करा, असे थेट आव्हान दिले होते. आज अरविंद केजरीवाल यांनी आपल्या प्रमुख नेत्यांसह दिल्ली भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला पक्ष संपवण्याच मिशन हातात घेतले आहे. आपल्याला संपवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन झाडू सुरू केले. देशभरात येत्या काळात आप भाजपसाठी धोका ठरू शकते म्हणून आतापासूनच पक्षाला संपवण्याच काम सुरू झाले आहे. ऑपरेशन झाडू अंतर्गत आपच्या मोठ्या नेत्यांना अटक केली जाईल, आप पक्षाचे बॅंक अकाऊंट सीज केले जातील, आप पक्षाच कार्यालय बंद करून पक्षाला रस्त्यावर आणण्याचा त्यांचा प्लॅन आहे. असे खळबळजनक आरोप अरविंद केजरीवाल यांनी केले.
भाजपवर गंभीर आरोप
"आपच्या एका एका नेत्याला भाजपवाले अटक करत आहेत. आज आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आम्हाला एकत्र अटक करा. आपण भाजप ऑफिसकडे इथून जाणार आहोत, पोलीस जिथे अडवतील तिथ आपण रस्त्यावर बसू, तिथेच पोलिसांनी अटक करावी,जर आज भाजपने अटक केली नाही तर अर्ध्या तासाने आपण पुन्हा माघारी येऊ, त्यांनी अटक केली नाही तर ही त्यांची हार असेल," असे आव्हानही अरविंद केजरीवाल यांनी दिले.
आपचा मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी भाजप कार्यालयाकडे मोर्चा सुरू केला आहे. त्यानंतर भाजप कार्यालयाच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले असून परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.