सध्या सर्व आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन होतात. ऑनलाईन व्यवहार वाढल्याने ऑनलाईन फसवणूकांचे प्रकारही वाढले आहेत. बेंगळूरमधून एक सर्वात मोठा आणि चक्रावून टाकणारा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. दोन इंजिनियर तरुणांनी मिळून हा कारनामा केला असून तब्बल ८५४ कोटींचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेंगळुरू पोलिसांनी ८५४ कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक घोटाळा उघडकीस आणला आहे. गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. एका खोलीमधून, ८४ बॅंक खात्यांमधून हा सर्वात मोठा फसवणूकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने बेंगळूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत संबंधित महिलेने वेगवेगळे ॲप आणि व्हॉट्सॲपग्रूपद्वारे कमी गुंतवणूक करुन फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरूवातीला काही पैसे मिळाले मात्र नंतर त्यांची ८.५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे महिलेने सांगितले होते.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता एमबीए पदवीधर मनोज श्रीनिवास (वय, ३३) आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर फणींद्र के. (वय ३६) ही दोन नावे समोर आली. या दोघांनी दोन वर्षांपूर्वी उत्तर बेंगळुरूमध्ये एकच बेडरूम भाड्याने घेतली आणि एक अज्ञात खासगी कंपनी उघडली.
यामधून ते लोकांना गुंतवणूकीचे आमिष दाखवून फसवणूक करायचे. सुरूवातीला त्यांनी १ ते १० हजारपर्यंत गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र अधिक नफा मिळवण्यासाठी काही लोकांनी एक ते १० लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. हे गुंतवलेले पैसे ऑनलाइन पेमेंटद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले.
या दोघांनी आणखी दोन तरुणांना कामावर ठेवले. त्यांना फक्त ८ मोबाईल फोन रात्रंदिवस सक्रिय ठेवण्याचे काम देण्यात आले होते. पोलीस तपासात या दोघांची तब्बल ८४ बॅंक खाती असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.