
देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईचा सर्वसामान्यांना जास्त फटका बसत आहे. महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी भाजी खरेदी करण्यासाठी थेट मार्केटमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी काही महिलांसोबत भाजी देखील खरेदी केली. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते भाजी मंडईतील भाज्यांचे भाव विचारताना दिसत आहेत.
राहुल गांधी यांच्यासोबत यावेळी काही स्थानिक महिला देखील होत्या ज्या भाज्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आल्या होत्या. यावेळी ते वेगवेगळ्या भाज्यांचे दर विचारत आहेत. भाज्यांचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
६० रुपये किलोपर्यंत विकले जाणारे वाटाणे यंदा १२० रुपयांच्या खाली येत नसल्याचे एका महिलेने सांगितले. कोणतीही भाजी ३०-३५ रुपये किलोपर्यंत नाही. राहुल गांधींनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'लसूण पूर्वी ४० रुपये किलो होता, आज ४०० रुपये!' वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडलं - सरकार कुंभकरणासारखे झोपले!
भाजी खरेदी करताना एका महिलेचे म्हणणे आहे की, वर्षभरात एकही भाजी स्वस्त झाली नाही. आम्हा मध्यमवर्गीय लोकांसाठी मूलभूत गोष्टी असलेला बटाटा आणि कांदा स्वस्त झाला नाही. एका महिलेने राहुल गांधींना सांगितले की, आम्ही चार-पाच भाजी घ्यायला आलो होतो, पण दोन भाजी घेऊन घरी जात आहोत. दरम्यान, राहुल गांधींनी एका महिलेला विचारले की, तुम्हाला महागाई का वाढत आहे असे वाटते? यावर महिलेने संतप्त होत सांगितले की, येथे बसलेले सरकार या गोष्टीकडे पाहत नाही. ते फक्त आपल्या भाषणात मग्न आहे. सामान्य जनता एवढे महागडे अन्न कसे खाईल हे त्यांना दिसत नाही.
राहुल गांधींचा हा व्हिडिओ दिल्लीतील गिरीनगरसमोरील हनुमान मंदिर भाजी मंडईतील आहे. राहुल गांधींसोबत काही महिलाही आहेत. आम्ही राहुल गांधींनाही आमच्या घरी चहापानासाठी बोलावले असल्याचे एका महिलेने सांगितले. 'किती महागाई आहे ते देखील पाहा. आमच्या घराचं बजेट खूप कोलमडलंय.', असं एक महिला सांगते. 'कोणाचा पगार वाढला नाही. मात्र ज्या भाज्यांचे दर वाढले आहेत, ते कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.', असे दुसऱ्या महिलेने सांगितले. कोणत्याच भाजीचा भाव ३० ते ३५ रुपये नाही, ज्या काही भाज्या मिळतात त्या ५० रुपयांवर आहेत. यावेळी एका भाजी विक्रेत्याने भाज्याचे दर खूप वाढल्याचे मान्य केले. त्याने सांगितले की, 'यावेळी खूप महागाई आहे. यापूर्वी ऐवढे भाव कधीच नव्हते.'
राहुल गांधींनी भाजी विक्रेत्याला लसणाचा भाव विचारला. यावर महिला म्हणते की, आम्ही लसूण विकत घेऊ शकणार नाही ऐवढे भाव आहेत. ती पुढे म्हणते की, सोनं स्वस्त झाले, लसूण महाग झाले. भाजी विक्रेत्याने लसणाचा भाव ४०० रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगितले. त्याचे दर कमी केले तरच आम्ही ते खरेदी करू शकतो. महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भाजी विक्रेत्याने ९० रुपये पावकिलो लसूण देण्याचे मान्य केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.