लाखभर सैन्य, शेकडो जहाज..; तैवानवर हल्ल्याचा चीनचा खतरनाक प्लान, ऑडिओ लीक

तैवानवरील हल्ल्याचा चीनचा मोठा कट उघड, ऑडिओ क्लिप लीक
Xi Jinping
Xi Jinpingsaam tv

नवी दिल्ली: चीनची (China) तैवानवर करडी नजर आहे. चीनकडून तैवानजवळ समुद्रात गस्त वाढवण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येतं. त्याचवेळी तैवानसंबंधी (Taiwan) आता चीनचा एक कथितरित्या खतरनाक प्लान उघड झाल्याचे बोलले जात आहे. चीनच्या अधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये चिनी लष्कराचे काही बडे अधिकारी चर्चा करत असून, चिनी सैन्याकडून तैवानवर हल्ला करण्याची योजना आखण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी जपान दौऱ्यावर असताना चीनला कडक इशारा दिला आहे. तैवानवर हल्ल्याचा प्रयत्न जरी झाला तरी, त्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल, असं बायडन म्हणाले.

Xi Jinping
रोज ५० किमी प्रवास, व्हिडिओ बघून गोलंदाजी शिकला; आता सोन्याचे दिवस, चक्रावून टाकणारा प्रवास

चीनच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत चर्चा झाल्याचे ऑडिओ क्लिपवरून लक्षात येते. या बैठकीत गुआंगडोंग पार्टी सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, गव्हर्नर आणि व्हाइस गव्हर्नर आदी सहभागी होते, असे सांगितले जाते. या बैठकीतील चर्चेदरम्यान, ड्रोनपासून ते सैन्याला लागणारी शस्त्रे, साहित्याच्या उत्पादनासंबंधी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या ऑर्डरबाबत बोलणी सुरू असल्याचे ऑडिओ क्लिपवरून समोर आले आहे. तसेच गुआंगडोंग प्राताला पूर्व आणि पश्चिम वॉरझोनकडून टास्क दिला गेल्याचेही उघड झाले आहे.

ऑडिओ क्लिपमधील दाव्यानुसार, गुआंगडोंग प्रांताला १ लाख ४० हजार सैन्य, जवळपास हजार जहाज, १६०० हून अधिक मानवरहीत लष्करी सामग्री, २० विमानतळे, बंदरे, ६ रिपेअरिंग आणि जहाज निर्मितीसंबंधी यार्ड, १४ इमर्जन्सी ट्रान्सफर सेंटर आणि रसद, रुग्णालये, ब्लड बँक, तेल डेपो आणि गॅस स्टेशन आदींसह विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. चीनचा हाच गुआंगडोंग प्रांत तैवानच्या खूपच जवळ आहे. त्यामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची ही तैवानवरील हल्ल्याची योजना असल्याचे बोलले जात आहे.

Xi Jinping
'कान्स'मध्ये रेड कार्पेटवर टॉपलेस झाली महिला; महिलांवरील अत्याचाराविरोधात आक्रोश

नॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन रिक्रुटमेंट अधिकाऱ्याला नवी सैन्यभरती, निवृत्त झालेल्या सैनिकांना पुन्हा रुजू होण्यासंबंधी आणि विशेष श्रेणीत भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण १५,५०० जणांची भरती करण्यासंबंधी चर्चा यात झाल्याचे कळते. ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चीनमधील मानवाधिकार कार्यकर्ता जेनिफर हेंग यांनी सोशल मीडियावर ती क्लिप अपलोड केली आहे. चिनी लष्कराची एखादी बाब पहिल्यांदाच अशा प्रकारे समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांनी लीक केल्याचा दावा केला जात आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा हा प्लान जगासमोर आणण्याचा त्यांचा हेतू आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com