Chhattisgarh Election 2023 Survey: आगामी लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस विशेषता: INDIA आघाडीने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा देशात एनडीएचं सरकार स्थापन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगड आणि मध्यप्रदेश निवडणुका होणार आहेत.
या दोन राज्यांतील निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी देश स्तरावर सर्वेक्षण केले आहे. सर्व्हेनुसार काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. तरीही छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या ओपिनियन पोलमध्ये छत्तीसगडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे, असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. यावर भाजपची (BJP) चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, छत्तीसगडमधील एकूण 90 जागांपैकी काँग्रेसला 46 टक्के मतांसह सर्वाधिक 48-54 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर भाजपला 41 टक्के मतांसह 35-41 जागा मिळतील, असा अंदाज आहे. इतरांना 13 टक्के मतांसह 0-3 जागा मिळत असल्याचं आकडेवारीनुसार दिसून येतंय. याशिवाय जर तुम्हाला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल? असाही प्रश्न विचारण्यात आला.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 71 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली आहे. तर 24 टक्के लोकांनी राहुल गांधी यांचं नाव घेतले आहे. तर 4 टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. दरम्यान, छत्तीगडचा पुढील मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न देखील जनतेला प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर 49 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आपली पहिली पसंती दिली आहे. तर 24 टक्के लोकांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना आपली पसंती असल्याचे म्हटले आहे. एकूणच छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या बाजूने वातावरण असल्याचं ओपिनियन पोलमधून दिसून येतंय. त्यामुळे आगामी काळात भाजप छत्तीगडसाठी काय रणनिती आखणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.