हवामान आणि नैसर्गिक आपत्तींच्या संकटांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 'मिशन मौसम' या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. हा उपक्रम भारतीय हवामान विभागाच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. ज्यामुळे देशातील हवामान अंदाज प्रणालीला सुधारण्यात आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षमता वाढवण्यात मदत होणार असून सरकारने यासाठी 2000 कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं आहे.
हवामान अंदाज प्रणालीमध्ये सुधारणा करणे आणि नैसर्गिक आपत्तींना अधिक प्रभावीपणे तोंड देण्यासाठी योग्य तयारी करणे हा 'मिशन मौसम' चा मुख्य उद्देश आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाच्या अचूक अंदाजांना सुधारण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना नैसर्गिक संकट येण्याआधी सतर्क केलं जाईल. ज्यामुळे संकटाच्या काळात होणारं नुकसान कमी करता येईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने या योजनेसाठी 2000 कोटी रुपयांचं बजेट ठरवलं आहे, ज्याचा उपयोग हवामान विभागाच्या आधुनिकीकरणात केला जाईल. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचं इन्स्टॉलेशन, डेटा संकलनासाठी उपयुक्त साधने आणि हवामान अंदाज प्रणालीच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक संसाधनं समाविष्ट आहेत. हवामान अंदाज प्रणालीमध्ये सुधारणा केल्यामुळे भारतात हिवाळ्यात हिमस्खलन, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, आणि उष्णतेच्या लाटेमुळे होणारे नुकसान कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरवर्षी भारतात चक्रीवादळ, पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू होतो. 'मिशन मौसम' च्या माध्यमातून अचूक हवामान अंदाज प्रदान करून नागरिकांना आपत्तीच्या वेळेवर सज्ज होण्याची आणि त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता प्राप्त होईल. यामुळे नुकसान कमी होण्याची आणि जीवितहानी टाळता येण्याची शक्यता वाढेल.
या योजनेचा भाग म्हणून हवामान विभागाची संपूर्ण पुनर्रचना करण्यात येईल. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, डेटा संकलनाची प्रक्रिया सुधारणे, आणि हवामान विश्लेषणाच्या क्षमतांचा विस्तार करणे यांचा समावेश आहे. हवामान विभागाचे आधुनिकीकरण म्हणजे अद्ययावत प्रणालींचा वापर, जलद डेटा प्रोसेसिंग, आणि प्रगत विश्लेषणाच्या तंत्रज्ञानाचा समावेश करणे. यामुळे हवामानाच्या अंदाजांच्या अचूकतेत मोठी सुधारणा होईल.
'मिशन मौसम' चा प्रभाव फक्त नागरिकांच्या सुरक्षिततेपुरता मर्यादित नाही. या योजनेमुळे कृषी, विमान वाहतूक, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आणि पर्यटन क्षेत्रांमध्ये देखील सुधारणा होईल. हवामानाच्या अचूक अंदाजामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी माहिती मिळेल, ज्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता वाढवता येईल आणि निसर्गसंकटांचा परिणाम कमी होईल. विमान वाहतूक क्षेत्रातील हवामान अंदाजांमुळे उड्डाणाच्या सुरक्षेत सुधारणा होईल, आणि पर्यटन क्षेत्रात देखील हवामानाच्या माहितीमुळे पर्यटनाच्या योजनांमध्ये मदत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'मिशन मौसम' ला मंजुरी देण्यात आली. सरकारचे उद्दिष्ट म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान अंदाज प्रणालीला अधिक प्रभावी बनवणे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षमतेला वृद्धिंगत करणे. याच्या माध्यमातून नागरिकांना अधिक माहितीपूर्ण आणि वेळेवर सूचना मिळतील, ज्यामुळे संकटाच्या काळात जीवितहानी आणि नुकसान कमी करणे शक्य होईल. टीव्ही ९ ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
सरकारच्या हे महत्त्वाकांक्षी मिशन एक मोठं पाऊल मानलं जात आहे. नवीन तंत्रज्ञान आणि भारतात हवामान अंदाजांच्या प्रणालीला सुधारण्यात आणि आपत्तींविरोधी तयारीला अधिक सक्षम बनवण्यात मदत करेल. या योजनेमुळे हवामान संबंधी माहितीची अचूकता आणि नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी जलद संदेश पोहोचवता येणार आहे. ज्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचवता येणं शक्य आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे भारतात नैसर्गिक आपत्तींना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्याची क्षमता प्राप्त होईल आणि देशाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल पुढे टाकता येईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.