देशातील पोटनिवडणुकीत भाजपचं वर्चस्व; 7 पैकी 4 जागांवर विजय

देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभेच्या जागांमध्ये 4 जागांवर भाजपचा विजय
BJP
BJPsaam tv

नवी दिल्ली - सहा राज्यांमधील विधासभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 4 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. सर्व जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. पोटनिवडणूकीत झालेला भाजपचा विजय 2024 च्या लोकसभा निवडणूकीत विरोधकांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

असे असले तरी तेलंगणामध्ये भाजपला (BJP) परावभावाला सामोरे जावे लागले आहे. तेलंगण राष्ट्र समिती या पक्षाकडून एक जागा हिसकावून घेण्यात भाजपला अपयश आले आहे. तर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला एक जागा मिळाली आहे, तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने उत्तर प्रदेशच्या गोला गाकर्णनाथ, बिहारच्या गोपालगंज आणि हरियाणातील आदमपूर येथे विजय मिळवला. ओडिशातील धामनगर येथील जागा भाजपने जिंकल्या आहे. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (Shivsena) आपली जागा राखली आहे. येथे भाजपने उमेदवार मागे घेतला होता.

BJP
Shivsena : विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील, विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील; सामनातून टीकास्त्र

महाराष्ट्रात ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यांच्यापाठोपाठ दुसरा नंबर नोटाचा आहे. 'नोटा'ला तब्बल 12 हजार 776 इतकी मतं मिळाली आहे.

हरियाणात आदमपूरमध्ये भाजपची बाजी

हरियाणातील हिसार जिह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार भव्य बिश्नोई 16,606 मतांनी विजयी झाले. गेल्या वेळी त्यांचे वडील कुलदीप बिश्नोई येथून विजयी झाले होते. मात्र, त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राजीनामा दिला. त्यानंतर ही पोटनिवडणूक घ्यावी लागली.

बिहारमध्ये आरजेडी-भाजपला 1-1

बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वींचा राष्ट्रीय जनता दल एकत्र आल्यानंतर प्रथमच ही निवडणूक झाली. त्यामुळे या दोन जागांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मोकामामध्ये आरजेडीचा उमेदवार तर गोपालगंजमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. मोकामा येथे बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी भाजपच्या सोनम देवी यांचा 16,707 मतांनी पराभव केला. गोपालगंजमध्ये भाजपच्या कुसुम देवी यांनी शेवटच्या फेरीत आरजेडीच्या मोहन गुप्ता यांचा 2,183 मतांच्या फरकाने पराभव केला.

तेलंगणातील मुनुगोडे येथे टीआरएसचा संघर्षमय विजय

तेलंगणातील मुनुगोडे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात सत्ताधारी टीआरएसने चौथ्या फेरीत आघाडी घेतली आहे. या दृष्टिकोनातून टीआरएस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष दिसून आला. येथे टीआयएसच्या कुसुकुंतला प्रभाकर रेड्डी यांनी विजय संपादन केला आहे.

ओडिशातील धामनगरमध्ये भाजपची सरशी

ओडिशात सत्तारूढ बीजू जनता दल आणि भाजप यांच्यात थेट लढत होती. भाजपचे आमदार बिष्णू चरण सेठी यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपच्या सूर्यवंशी सूरज सेठी यांनी विजय मिळवला.

उत्तर प्रदेशात भाजपचा विजय

उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथची जागा भाजपने राखली आहे. भाजपच्या अमन गिरी यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि समाजवादी पक्षाच्या (एसपी) उमेदवाराचा ३४,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. भाजपचे आमदार अरविंद गिरी यांचे ६ सप्टेंबर रोजी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com