Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV

Shivsena : विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील, विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील; सामनातून टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मुखपत्रातून भाजपसह शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.
Published on

मुंबई : सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray)  गटाच्या) उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचा हा पहिला विजय आहे. विजयानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मुखपत्रातून भाजपसह शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील, विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील, असा हल्लाबोल सामनाचा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे निव्वळ टाईमपास; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मतदारांचे मानले आभार

‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जनता मात्र आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस (Shivsena) विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. असं म्हणत सामनातून मतदारांचे आभार मानण्यात आले आहेत.

विरोधकांनी मशाल विझवण्याचा प्रयत्न केला

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जसा लागायचा तसाच लागला. भडकत्या मशालीवर विरोधकांनी गुळण्या टाकून विझविण्याचा प्रयत्न केला, पण मर्दांच्या हातातील मशालच ती. विझली नाहीच. उलट शिवसेनेचे तेज अधिक प्रकाशमान केले. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके 66 हजार 530 एवढी दणदणीत मते मिळवून विजयी झाल्या. असं सामनातून मांडण्यात आलं आहे.

'धनुष्यबाण गोठवून मिंध्यांना विकृत आनंद मिळाला'

'पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला. धनुष्यबाण गोठवून भाजप व त्यांच्या मिंध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली. हाती मशाल हे चिन्ह घेऊन नव्या लढय़ासाठी सज्ज झाली. जनता जनार्दनाचा हा संताप पाहून भाजप मिंधे गटाचे उमेदवार कोणी मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली', असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Adv Rahul Narvekar : शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? विधानसभा अध्यक्ष म्हणाले...

'मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला'

'महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून. मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला', अशी टीकाही सामनातून करण्यात आली.

‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’

'भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली', असा आरोपही सामनातून करण्यात आला.

फडणवीसांना कंसाची उपमा

'मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील' , असा घणाघातही सामनातून करण्यात आला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com