'हार जीतही लपंडाव रे', पुन्हा नव्या ताकदीने लढू; निकालानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीत निर्माण झालेल्या सत्ताविरोधी लाटेला आम्ही थोपवू शकलो नाही म्हणत सुरजेवाला यांनी अपयशाचे खापर अमरिंदर सिंग यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला.
'हार जीतही लपंडाव रे', पुन्हा नव्या ताकदीने लढू; निकालानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया
'हार जीतही लपंडाव रे', पुन्हा नव्या ताकदीने लढू; निकालानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया SaamTvNews

Assembly Elections Result 2022 : देशातल्या ५ राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाब, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झाले आहे. पंजाबसारखे (Punjab) हातातले राज्य सत्तेच्या या खेळात काँग्रेसने गमावले. काँग्रेसला (Congress) पंजाबमध्ये पक्षांतर्गत राजकारणाचा मोठा फटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या बाबतीत ज्या पद्धतीचे राजकारण काँग्रेस अंतर्गत घडले, त्यातून पक्षात बंडाळी माजली. कॅप्टन यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यांनतर अमरिंदर सिंगांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वेगळी चूल मांडली.

या घडामोडींनंतर चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना दलित चेहरा म्हणून काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची संधी देऊन दलित समाजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामोडीत पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्यावर आपला राजकीय वचपा काढल्याचे देशाने पाहिले. त्यानंतर सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेस हायकमांडने त्यांना पुन्हा पक्षाची सूत्रे हाती घेण्याचे आदेश दिले.

पंजाबमधील काँग्रेस पक्षांतर्गत मध्यंतरीच्या काळात घडलेल्या या सर्व घडामोडींचा परिणाम नकारात्मकरित्या निवडणूक निकालातून समोर आला आहे. शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, या शेतकरी आंदोलनातील भूमिका काँग्रेससह अकाली दलाच्याही पथ्यावर पडली नसल्याचे या निकालातून दिसून आले. केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलनाला दुर्लक्षित केले, या आंदोलनादरम्यान ७०० च्या वर शेतकऱ्यांचे प्राण गेले होते. साहजिक त्याचा फटका भाजपला पंजाबमध्ये बसणार हे निश्चित होते.

मात्र, पंजाबच्या जनतेने काँग्रेसलाही डावलल्याचे दिसून आले. दिल्लीतील चांगल्या कामाचा, उत्तम नागरी सोयीसुविधांचा प्रचार आपने (AAP) पंजाबमध्ये केला. आपच्या दिल्ली मॉडेलला पंजाबमध्ये उतरवण्याचे स्वप्न अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाबवासीयांना दाखवले. तेथील जनतेनेही 'आप'ला स्वीकारत बहुमत दिले आहे. काँग्रेसला मात्र सत्तेतून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली आहे.

आजच्या निवडणूक निकालानंतर आणि झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसकडून प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला (Randeep singh Surjewala) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरजेवाला म्हणाले, कोणत्याही निकालावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. पाच राज्यातील निवडणुकांचे परिणाम काँग्रेस पक्षाच्या अपेक्षांविरोधी लागले आहेत. उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या राज्यात आम्हाला विजयाची अपेक्षा होती. परंतू, जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो नाही हे आम्हाला मान्य करावे लागेल. पंजाबमध्ये चरणजित सिंग चन्नी यांच्या रूपात आम्ही चांगला आश्वासक चेहरा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापूर्वीच्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीत निर्माण झालेल्या सत्ताविरोधी लाटेला आम्ही थोपवू शकलो नाही. जनतेने सत्ताबदलाचा कौल दिला, म्हणत सुरजेवाला यांनी अपयशाचे खापर अमरिंदर सिंग यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांनी हा सत्ताबदल स्वीकारत असल्याचे सांगून, आम आदमी पार्टी, भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. उत्तरप्रदेशात आम्ही काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आम्ही या जनमतास विजयी जागांमध्ये परावर्तित करू शकलो नाही. या निवडणुकांना आम्ही, जातीयवाद आणि धर्मवादी राजकीय ध्रुवीकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, जनतेच्या मूलभूत प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवली. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत वैकासिक मुद्दे घेऊन आम्ही लढलो. मात्र, भावनिक राजकारण करण्यात आम्ही अयशस्वी ठरल्याचे सुरजेवाला म्हणाले.

आम्ही हरलो अथवा जिंकलो हे सध्या महत्वाचे नसून जनतेच्या सोबत काँग्रेस पक्ष कायम आहे. आगामी काळात जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढत राहणार असून या पराभवाचे आत्मचिंतन करण्यात येईल. येत्या काळात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष्य देणार असून लवकरच सोनिया गांधी पक्षातील पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घेणार आहेत. पराभवाच्या कारणांवर या बैठकीत मंथन करण्यात येईल. निवडणूक हरलो असलो तरी आम्ही हिंमत हरलो नसून येत्या काळात जोपर्यंत आम्ही विजय प्राप्त करत नाही तोपर्यंत लढत राहू असे सुरजेवाला म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com