डेनव्हर विमानतळावर AA3023 विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आग लागली
१७३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे विमानाबाहेर काढण्यात आलं
टेकऑफपूर्वीच आगीचा प्रसंग घडल्यामुळे मोठा अपघात टळला
या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
अमेरिकेतील डेनव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला. एअरलाइन्सच्या AA3023 या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये अचानक आग लागली, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या विमानात एकूण १७३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षितपणे विमानाबाहेर काढण्यात आलं, त्यामुळे जीवितहानी टळली. घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये धुराने भरलेलं वातावरण आणि घाबरलेले प्रवासी खाली उतरत असल्याचं स्पष्ट दिसून येतं.
ही घटना दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास घडली असून, AA3023 हे विमान गेट C34 वरून दुपारी १:१२ वाजता निघण्याच्या तयारीत होतं. टेकऑफच्या आधी लँडिंग गियरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक त्यातून धूर आणि आग निघू लागली. त्यामुळे उड्डाण तातडीने रद्द करण्यात आलं. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ अलर्ट होऊन घडलेल्या घटनेबाबत अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं आणि संध्याकाळी ५:१० वाजेपर्यंत संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली.
या प्रक्रियेदरम्यान एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डेनव्हर विमानतळ प्रशासनाने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करत सांगितलं की, विमान धावपट्टीवर असताना आणि टेकऑफसाठी सज्ज होत असताना ही घटना घडली. सर्व संबंधित यंत्रणा तत्काळ कृतीशील झाल्यामुळे मोठा अपघात टळला.
संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत विमानातून बाहेर पडताना दिसतात. टायर्सजवळून धूर निघत असलेला आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धावत येत असल्याचे दृश्य अत्यंत भयावह आहे. दरम्यान, या घटनेमुळे विमानसेवेवर काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असून, संबंधित विमानाच्या तांत्रिक तपासणीचे काम सुरू आहे.
डेनव्हर विमानतळावर नेमकं काय घडलं?
AA3023 विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आग लागली आणि टेकऑफपूर्वी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं.
विमानात किती प्रवासी होते आणि ते सुरक्षित आहेत का?
एकूण १७३ प्रवासी आणि ६ क्रू सदस्य होते. सर्वजण सुरक्षितरित्या बाहेर पडले.
ही आग कशामुळे लागली?
लँडिंग गियरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने धूर व आग लागली, असं प्राथमिक अंदाज आहे.
यामध्ये कोणालाही इजा झाली का?
एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून बाकी सर्वजण सुरक्षित आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.