मुंबईतल्या वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) मोठी अपडेट समोर आली आहे. मिहीर शहाने (Mihir Shah) पोलिसांना चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती दिली आहेत. वरळी पोलिसांनी यासंदर्भात गुरूवारी खुलासा केला की, आरोपीने अपघातापूर्वी मालाडच्या बारमधून बिअर विकत घेतली आणि ती कारमध्येच प्यायला. ही घटना जुहू बारमधून बाहेर पडल्यानंतर झाली. या बारमध्ये मिहीरने आपल्या मित्रांसोबत व्हिस्कीचे चार मोठे पेग प्यायला होता. पोलिसांनी पुढे सांगितले की, चौकशीदरम्यान मिहीरने दावा केला की, त्याला बंपर आणि कारच्या टायरमध्ये ती महिला अडकली आहे हे समजलेच नाही आणि म्हणून तो कार चालवत राहिला.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'मिहीरने आम्हाला सांगितले की कारच्या बंपर आणि टायरमध्ये ती महिला अडकली होती आणि ती फरफटत जात आहे याची मला कल्पना नव्हती. एक किलोमीटरहून अधिक प्रवास केल्यानंतरच माझ्या लक्षात आले की काही तरी गडबड आहे कारण टायगर हालत होते. टायरमध्ये काहीतरी अडकले आहे हे लक्षात आल्यानंतर मी कार थांबवली आणि महिलेचा मृतदेह बाजूला काढला.'
मिहीरने चौकशीदरम्यान पोलिसांना पुढे सांगितले की, 'त्याने त्याचे वडील राजेश यांच्याशी संपर्क केला होता. ज्यांनी बिदावतला ड्रायव्हिंग सीट घेण्यास सांगितले आणि दावा केला की त्यांची कार चुकून पुन्हा तिच्या पायावरून गेली.' मिहीरचा ड्रायव्हर राजऋषी बिदावतला गुरुवारी एमसीच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला २५ जुलैपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बिदावतच्या कोठडीची मागणी करताना पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, 'बिदावत आणि मिहीर यांना तपासादरम्यान समोरासमोर आणले होते आणि तायांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. पोलिसांनी सांगितले की, ६ जुलैच्या रात्री मिहीर त्याच्या मित्रांसह जुहू येथील ग्लोबल तापस बारमध्ये गेला होता. जिथे त्यांनी व्हिस्की प्यायली होती. या चार व्यक्तींपैकी एक बारमध्ये नियमित यायचा. म्हणून त्याने त्याचे ओळखपत्र दाखवले आणि मिहीरसह त्याच्यासोबत असलेल्या मित्रांच्या वयाबद्दल खोटे बोलला. त्यापैकी तिघांनी चार पेग व्हिस्की प्यायली. तर चौथ्या व्यक्तीने एनर्जी ड्रिंक प्यायले.
पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'बारमधून बाहेर पडल्यानंतर मिहीर आणि त्याचा ड्रायव्हर मित्रांना सोडण्यासाठी बोरिवलीला गेले. त्यानंतर त्यांनी कार बदलली आणि बीएमडब्ल्यू कार घेऊन ते मरीन ड्राइव्हला निघाले. दरम्यान ते मालाडमधील साई प्रसाद बारमध्ये थांबले आणि बिअरचे चार ५०० मिली कॅन विकत घेतले होते. मिहिरने त्याच्या ड्रायव्हरलाही बिअर ऑफर केली होती. पण बिदावतने पिण्यास नकार दिल्याने त्याने चारही बिअर प्यायल्या. मिहीर बिअर प्यायल्यानंतर बिदावतने बीएमडब्ल्यू मरीन ड्राईव्हकडे नेली. त्याठिकाणी त्यांनी थोडावेळ घालवला. त्यानंतर मिहीरने बिदावतकडून कारची चावी घेतली आणि गिरगाव चौपाटीवरून ते वरळीकडे निघाले होते. त्यावेळी अपघात झाला.'
मिहीर शहाने भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरून प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी नाखवा हे जात होते. अपघातामध्ये प्रदीप जखमी झाले. तर कावेरी कारच्या बोनेट आणि चाकामध्ये अडकल्या. कारने त्यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मिहीर फरार झाला होता. मिहीरचे वडील राजेश यांनी मिहीरला पळून जाण्यास सांगितले होते आणि अपघाताची जबाबदारी ड्रायव्हरला घ्यायला सांगितली होती. या प्रकरणात मिहीर आणि बिदावत अटकेत आहेत. पोलिसांनी अपघातातील प्रत्यक्षदर्शींसह जवळपास १४ जणांचे जबाब नोंदवले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी मिहीरचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.