Maharashtra Assembly Monsoon Session 2023 Updates: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिंदे सरकार राज्यात सुरू असलेलं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळणार असल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा,महाविद्यालयांनादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकर संपवलं जाण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
मात्र, राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा शेवट याच आठवड्यात केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै २०२३ पासून सुरू झालं आहे. हे अधिवेशन ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालणार आहे.
या १९ दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस १५ असून शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे ठेवण्यात आले आहेत. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.
तर सरकारकडून सुद्धा विरोधकांना जोरदार प्रत्त्युतर देण्यात येत आहे. दरम्यान, आता राज्यातील पावसामुळे अधिवेशन लवकरच गुंडाळलं जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आज होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.