

मनोज जरांगे आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य
मनोज जरांगेंना अटक का केली नाही? छगन भुजबळांनी सांगितले कारण
बीड आंदोलनात 84 पोलीस जखमी झाले होते
मनोज जरांगेंबाबत सरकारला स्टँड घ्यावा लागेल असं मत भुजबळांनी व्यक्त केले
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी आता सरकारला थेट इशारा दिला की, दौरा रद्द करून मी थेट मुंबईत पोहचेल. मनोज जरांगे यांच्या या उपोषणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमात संपादक निलेश खरे यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंना अटक का केली नाही? यामागचे कारण सांगितले.
बीडमध्ये ८४ पोलिस जखमी झाले होते मग सरकारने जरांगेंना त्यावेळी अटक का केली नाही? या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळांनी सांगितले की, 'मी मुख्यमंत्र्यांना बोललो होतो की, ती तुमच्या एसपीची चूक आहे. त्याने मीडियासमोर सांगायला पाहिजे होते की माझे ऐवढे पोलिस जखमी झालेले आहेत त्यामुळे हे आम्हाला करावे लागले. पण त्यांनी नाही केले तर तुम्ही गृहमंत्री आहात हे तुम्ही करायला पाहिजे होते. यात तुमची चूक आहे त्यामुळे एकतर्फी सगळी माहिती लोकांपुढे गेली आणि खरी माहिती समोर आली नाही.'
या आंदोलनाला विरोध करायला सुरूवात केली तेव्हा छगन भुजबळांवर अनेक आरोप झाले. तुम्हाला भाजप बोलायला लावत आहे, भाजपशी तुमची हातमिळवणी झाली आहे, भाजप तुम्हाला पाठिंबा देतेय असे आरोप भुजबळांवर करण्यात आले होते. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, 'मंडल आयोगावरूनच मी शिवसेना सोडली. त्यानंतर महात्मा फुले समता प्रतिष्ठान स्थापन झाली. रामलीला मैदान आणि गांधी मैदानावर आम्ही आंदोलन केले. सगळ्या देशात आम्ही प्रचार केला की ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे. ही आजची लढाई नाही. त्यावेळी सुद्धा मी शिवसेनेतून बाहेर पडत धोका पत्कारला होता. मी लढतोय आणि शेवटपर्यंत लढत राहिल. मंत्रिपद असो नसो, कुणी सोबत असो वा नसो मी लढत राहणार. अन्याय झाला तर मी लढतो.'
मनोज जरांगेंच्या मागण्यांवर भुजबळांनी जोरदार टीका केली. त्यांच्या मागण्या काही संपत नसल्याचे सांगत ते म्हणाले की, 'यांनी शुक्र आयोग, शिंदे आयोग सुरू केला. सगळं रेकॉर्ड हैदराबाद इस्टेटमध्ये आहे म्हणाले. आहेत कुणबी तर देऊन टाका असे आम्ही म्हणालो. पण ते काही थांबायलाच तयार नाही. एक मागणी झाली तर दुसरी-तिसरी-चौथी मागणी सुरूच राहिली. खरं तर त्याचे अनेक लाड सरकारने पुरवले. त्यामुळे सर्व समाजाचा आणि सगळ्यांचा एक समज झाला की जरांगेंना सरकार घाबरत आहे त्यामुळे त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत गेला.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.