Election commission PC : राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे

Election Commission of India: आज मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यातीलच महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ...
राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे
Election Commission of IndiaSaam Tv
Published On

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या असून लोकशाहीच्या या उत्सवात महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी विशेषतः शहरी भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे सहभागी होत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे केले.

हॉटेल ट्रायडंट येथे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने यंत्रणांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजीव कुमार माध्यमांना संबोधित करत होते.

राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Election : आगामी निवडणुकीत राखीव मतदारसंघ आणि महिला मतदारसंघाची संख्या किती? आयोगाने दिली महत्वाची माहिती, वाचा

राजीव कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात एकूण २८८ मतदार संघ असून सर्वसाधारण मतदार संघ २३४, अनुसूचित जमातींसाठी राखीव २५ तर अनुसूचित जातींसाठी २९ मतदारसंघ राखीव आहेत. राज्यात एकूण ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ४.९५ कोटी पुरुष तर ४.६४ कोटी महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी ५९९७, दिव्यांग ६.३२ लाख इतके मतदार आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या १२.४८ लाख आहे. तर १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या १९.४८ लाख इतकी आहे. राज्यात राबवण्यात येत असेलल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामुळे महिला मतदारांची नोंदणी मोठ्या संख्येने वाढलेली असून १०.१७ लाख या प्रमाणात झालेली वाढ ही अभिनंदनीय बाब आहे. हजार पुरूषांमागे महिलांची संख्या ९१४ वरून ९३६ इतकी वाढली आहे. तसेच १८ ते १९ वयोगटातील नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या महिलांची संख्या ७.७४ लाख इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

शंभर पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ४९ हजार ३४ इतकी असून निवडणूक आयोगामार्फत ८५ त्यावरील ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांसाठी घरपोच मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ज्येष्ठ मतदार हे मतदान कक्षावर येऊन मतदान करण्यासाठी उत्सुक असतात, हे लोकसभेच्या मतदानाच्या वेळी प्रकर्षाने दिसून आले. ही बाब युवा मतदारांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगून राजीव कुमार यांनी नवमतदार तसेच महिला आणि शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी पुढे येत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केले.

राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे
Election commission PC Live: राज्यात 'या' मतदारसंघात होतं सर्वात कमी मतदान, जम्मू - काश्मीरचा दाखला देत निवडणूक आयुक्त काय म्हणाले? वाचा...

राज्यात एक लाख १८६ मतदान केंद्र असून शहरी भागात ४२ हजार ५८५ तर ग्रामीण भागात ५७ हजार ६०१ मतदान केंद्र असणार आहेत. २९९ मतदान केंद्र हे दिव्यांग संचलित असतील तर ३५० हे युवा संचलित असतील. महिला संचलित मतदान केंद्रांची संख्या ३८८ असेल. प्रत्येक मतदान केंद्रावर मदत केंद्र, दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी यासह सर्व आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करुन देण्याचे नियोजन असल्याचे राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.

अति दुर्गम भागात प्रत्येकाच्या घरी जाऊन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. त्यात कातकरी, कोलम, मारिया गोंड या आदिवासी समाजातील मतदारांची शंभर टक्के नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच रोजंदारी कामगारांनाही मतदानासाठी भरपगारी रजा देण्याच्या सूचना आयोगाने संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

मतदारांसाठी ऑनलाईन सुविधा

मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी VHA ॲप तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास C-Vigil ॲपवर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. ज्यावर आयोगामार्फत तातडीने कारवाई करण्यात येईल. निवडणुकीतील उमेदवारांच्या संदर्भातील माहिती KYC (Know Your Candidate) या ॲपवर उपलब्ध असणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ११ राजकीय पक्षांसोबत आढावा घेतला असून येत्या काळात असलेल्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची सूचना राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, शहरी भागात मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर गर्दी होत असते हे लक्षात घेऊन पूरक सुविधांसह अधिक संख्येने मतदान केंद्रांची उपलब्धता ठेवण्याच्या सूचनांचा आयोग विचार करणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही कायदा व सुव्यस्थेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा घेऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर होणार नाही यासाठी तसेच मद्य, अंमलीपदार्थांचे वाटप या सारख्या केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. मतदारांना जास्तीत जास्त सुलभतेने मतदानाचा हक्क बजावता यावा, यादृष्टीने सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

देशात कमी मतदानाचा टक्का असलेल्या महाराष्ट्रातील शहरी भागातील प्रामुख्याने कुलाबा, कल्याण, मुंबादेवी, पुणे या सारख्या शहरांतील मतदारांनी आपल्या भागातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आर्वजून पुढे यावे. अद्यापही ज्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदविले नाही ते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. ही प्रक्रिया आयोगामार्फत निरंतर सुरू आहे, असे सांगून सर्व मतदारांनी आपल्या लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजीव कुमार यांनी यावेळी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com