नवी मुंबईतील उलवे सेक्टर-८ परिसरात वारंवार वीज खंडित
एका महिलेने उशी आणि चादर घेऊन थेट महावितरण कार्यालय गाठले
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
गेले काही दिवस राज्यात तापमानाचा पारा ४० शी पार होता. उकाड्याने अंगाची लाही लाही झाल्याने नागरिक हैराण झाले होते. अशातच मुंबईतील काही भागांमधील बत्ती गुल झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. नवी मुंबईत देखील अशीच एक घटना घडली. दिवसभर कामातून दमून आलेल्या एका तरुणीला वीज पुरवठा खंडित झाल्याने अख्खी रात्र उकाड्यात काढावी लागली. याचं संतापात तरुणीने चादर घेऊन थेट महावितरणाचं ऑफिस गाठलं. तर दुसऱ्या एका महिलेने रडत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी मुंबईतील उलवे सेक्टर-८ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाडा, अंधार आणि झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. उलवे सेक्टर-८ येथे राहणाऱ्या या महिलेने व्हिडीओ काढून तो व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये महिलेने म्हटले आहे की, ती दिवसभर काम करून रात्री उशिरा घरी येते. अशावेळी विश्रांतीची गरज असते, मात्र परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तिला आणि तिच्यासारख्या अनेक नागरिकांना रात्री झोप मिळत नाही.
महिलेच्या म्हणण्यानुसार, अनेकदा रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत वीजपुरवठा बंद राहतो.उकड्यामुळे घरात राहणे कठीण होते. पंखे, एसी बंद पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. व्हिडीओमध्ये बोलताना महिला भावुक झाल्याचे दिसून आले. अनेक दिवस पुरेशी झोप न मिळाल्याने मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत असल्याची खंत तिने व्यक्त केली. तसेच, सकाळी पुन्हा वेळेवर कामावर जायचं असल्याने अशा परिस्थिती जाणे अधिकच कठीण होत असल्याचे तिने सांगितले. दरम्यान दुसऱ्या एका कामोठेतील महिलेने थेट उशी आणि चादर घेऊन महिलेने महावितरणचे ऑफिस गाठले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेक नागरिकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. परिसरातील रहिवाशांनीही वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित प्रशासन आणि महावितरणने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. दरम्यान ही व्यथा फक्त नवी मुंबईतील नागरिकांची नसून मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, विरार सारख्या अनेक भागातील आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी नागरिकांची मागणी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.