
वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलंय. सर्वेक्षणाचं काम पुढील दिड महिना चालणार असल्याचं बोललं जात आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार असून, भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पूलावरून मेट्रो आणण्याच्या कामाला एमएमआरडीएने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर कामाला वेग आला आहे. हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग मीरा भाईंदर ते विरारपर्यंत असणार आहे. त्यात २० स्थानकांचा समावेश आहे.
वसई विरारची एकूण लोकसंख्या पाहता, तसेच मीरा - भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार वसई विरारसाठी मेट्रो १३ ची घोषणा करण्यात आली आहे. सध्या मेट्रो मार्ग खाडीतून जाणार असल्यानं अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात येत आहे.
भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पूलावरून मेट्रो आणण्याचं ठरविण्यात आलं आहे. खाडीवरून रस्तापूल आणि मेट्रो अशी रचना असणार आहे. भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतची सरंचनात्मक आराखडा तयारीचे काम प्रगतीपथावर आहे. भाईंदर वसई पूलाचा आराखडा आणि संरचनात्मक आराखडा प्राधिकरणाच्या दळणवळण विभागाकडे अग्रेसित करण्यात आलेला आहे.
मेट्रो आणि खाडीपूल एकाच मार्गिकेवरून असले तरी, त्यांचं काम एमएमआरडीएच्या २ स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. भौगोलिक रचना, हवामान याचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचं काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे अभियंता बनसोडे यांनी दिलीय.
मीरा भाईंदर या शहरात मेट्रो मार्गाचे स्थापत्य काम चालू असून, त्याच मार्गाला हा वसई विरार मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे. आता भाईंदर खाडीत प्रस्तावित पूल आणि मेट्रो एकाच ठिकाणाहून जाणार आहे. यामुळे खर्चात बचत देखली होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.