वर्सोवा प्रभाग ५९ मध्ये उद्धव ठाकरे गटात उमेदवारीवरून बंड
सचिन शिवेकरांनी हजारो समर्थकांसह अपक्ष अर्ज दाखल करून शक्तीप्रदर्शन केले
मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम समाजासह भाजप-मनसे पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा
प्रभागात आता स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा निर्णायक सामना रंगणार
संजय गडदे, मुंबई
महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूनी एकत्र येत युती केल्याचं जाहीर केलं. अनेक ठिकाणी मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र लढणार असली तरी , वर्सोवा प्रभाग क्रमांक ५९ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मोठी फूट उघडकीस आली असून, उमेदवारीवरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रभाग ५९ साठी शैलेश फणसे यांना उमेदवारी जाहीर होताच स्थानिक इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
या नाराजीचे रूपांतर थेट बंडात झाले असून, इच्छुक उमेदवार सचिन शिवेकर यांनी हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरत ताकद दाखवली आहे. “प्रभाग आणि विधानसभेच्या बाहेरचा उमेदवार लादण्यात आला” असा आरोप करत स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उघडपणे पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, सचिन शिवेकर यांना मराठी, उत्तर भारतीय तसेच मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोबतच शिवसेना ठाकरे गटासह भाजप मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा देखील शिवेकर यांना पाठिंबा मिळत आहे. बाहेरच्या’ उमेदवारामुळे मतदारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, केवळ ठाकरे गटच नव्हे तर भाजपानेही बाहेरचा उमेदवार दिल्याने सर्वच प्रमुख पक्षांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
या पार्श्वभूमीवर “स्थानिक उमेदवारालाच संधी मिळावी” या भूमिकेतून अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सचिन शिवेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, अशी उघड मागणी केली आहे. त्यामुळे वर्सोवा प्रभाग ५९ ची लढत आता केवळ पक्षीय न राहता थेट स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी रंगतदार आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रभाग ५९ मध्ये नेमका कोणाचा झेंडा फडकणार, याकडे आता संपूर्ण वर्सोव्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.