मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शिवसेना भवन येथे जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला. तुमचं भविष्य उज्ज्वल असेल तर, तुम्हीही तुमचा निर्णय घेऊ शकता. जिद्द असेल तर राहा, नाहीतर तुम्हीही सोडून जा, असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं. त्याचवेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं एकमुखानं सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी सर्व जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आणि भाजपवरही निशाणा साधला.
हे देखील पाहा -
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आता पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, नगरसेवकांनाही फोन येत आहेत. दमदाट्या होत आहेत. पदाधिकाऱ्यांना फोन जातात. भाजपने हा चालवलेला डाव आहे. तिथे गेलेले गोडीगुलाबीने गेलेले आमदार आता कैद झाले आहेत. त्यांची सुटका कशी करायची हे बघायचे आहे. मला जोपर्यंत सोबत कुणी येत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवायला तयार नाही. आपल्यासोबत कुणीच नाही असे धरून चाला. अशा मानसिकतेत तुम्ही पुन्हा नवी जिद्द बाळगता की नाही, एवढंच मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे असे म्हणताच सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ज्यावेळी शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला होता, तीच परिस्थिती आता आहे असे समजा. तुमच्यात जिद्द असेल तर सोबत राहा. मी तुम्हालाही सांगतो, तुमचं भविष्य उज्ज्वल वाटत असेल तर, जरूर तिकडे जा. प्रत्येकाला स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याचा अधिकार आहे. मी कुणाच्याही आड येऊ इच्छित नाही. मी पात्र नसेल तर सांगा, हे पद आता सोडायला तयार आहे, असा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी असे म्हणताच, सर्वांनीच उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. तसेच घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'तुम्हाला अजिबात ब्लॅकमेल करत नाही. माझ्या प्रेमात अडकू नका. मी लायक नसेल तर सांगा. मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, पण त्यांचं लाडकं अपत्य हे शिवसेना आहे. केवळ शिवसेना पुढे कशी जाईल, याचा विचार करून निर्णय घ्या.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.