कल्याण: मलंगगड येथील कुशिवली धरणाच्या (Kushivali Dam) मोबदला घोटाळ्यामध्ये तीसपेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकरणाची गांभिर्यता अधिक असल्याने उल्हासनगर विभागाचे उप विभागणीय अधिकारी यांनी किती शेतकऱ्यांना शासनाचा मोबदला दिला आहे, किती पैशामध्ये घोटाळा (Scam) झाला आहे, याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. त्यामुळे आता लवकरच यासंदर्भात खरी आकडेवाडी बाहेर पडणार आहे. तसेच आतापर्यंत या प्रकरणात चार गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. (Kushivali Dam Scam Latest News)
हे देखील पाहा -
बनावट कागपत्रांच्या आधारे एका बोगस टोळीने शेतकऱ्यांचे पैसे परस्पर लंपास केले आहेत. बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड तयार करून या टोळीने कोट्यवधी रुपये लाटले आहेत. त्यामुळे सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी तीसपेक्षा अधिक आरोपींना गजाआड केलं असून पोलिसांनी तपासाला गती दिलेली आहे. तर या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांना पुण्यामध्ये लागले असल्याने पोलिसांनी पुण्यामधून आरोपी गजाआड केले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी अन्य आरोपींची चौकशी केली असता पुणे नंतर अहमदनगर कनेक्शन असल्याचे देखील समजू लागले आहे. त्यामुळे सध्या पोलिसांचे एक पथक अहमदनगरमध्ये तपासाला गेलं असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. मयत आणि जिवंत शेतकऱ्यांचे बनावट कागदपत्र तयार करून लुटण्यात आलेल्या पैशांची आणि शेतकऱ्यांनी याआधी घेतलेल्या मोबदल्याची सध्या समिती चौकशी करत आहे. तहसीलदार, एक अधिकारी आणि एक कर्मचारी अशी ही समिती आहे. त्यामुळे आता नक्की शासनाची किती रुपयांची फसवणूक या भामट्यांनी केली आहे याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. (Three-tier committee formed on Kushivali dam Scam case; Filed a fourth offense)
कुशिवली गावाजवळ असलेल्या आंभे गावातील अनिल भाग्यवंत हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल आहेत. तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबत आणि पोलिसांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध असल्याने त्याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. त्याने अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची संपत्ती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे अनिल भाग्यवंत हा पोलिसांना काय माहिती देतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणावरून भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत. "कुशिवली धरणामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी आमचा वारंवार पाठपुरावा सुरु आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. तत्कालिन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी हा मोबदला वाटप करताना कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप करत भ्रष्टाचार केला असून त्यांना पहिले अटक झाली पाहीजे". अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.
"धरण घोटाळ्यात शिवसेनेचे नेते तसेच राष्ट्रवादी सरपंचाचे भाऊ आहेत. त्याचबरोबर अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारीही यामध्ये सामील आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली नाही तर येत्या आठ दहा दिवसांत उप विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल" असा इशाराही आमदार गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी दिला आहे. तर गिरासे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत हे निव्वळ राजकीय आरोप असल्याचं म्हटलंय. तसंच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीये.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.