कुशिवली धरण घोटाळा प्रकरण; निवृत्त नायब तहसीलदार पोलिसांच्या ताब्यात
कल्याण : मलंगगड येथील कुशिवली धरणासाठी (Kushivali Dam) २०१९ पासून भूसंपादनाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी १५७ कोटी १६ लाखांची तरतूद केली आहे. आजपर्यंत भूसंपादन केलेल्या जमीन वाटपाची एकूण किंमत १८ कोटी ७८ लाखांपैकी ११ कोटी ५१ लाखाचे वाटप झाले, तर सात कोटी २० लाख रुपयांचे वाटप शिल्लक आहे. मात्र हे धरण तयार होण्याआधीच घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी (Police) यामध्ये आतापर्यंत २५ जणांना अटक केली आहे. तर यामध्ये निवृत्त नायब तहसीलदार मोहन खिसमतराव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Kushivali Dam Scam Latest News)
पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी तिसऱ्या गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणात तब्बल ६० लाख रूपयांचा मोबदला लाटण्यात आला आहे. याप्रकरणानंतर भूसंपादन मोबदला अपहाराची रक्कम एक कोटी २३ लाख रूपयांवर पोहोचली आहे. उपविभागीय कार्यालयाने केलेल्या तपासणीत आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आले असून यात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मयत मूळ वारसांच्या वारसांऐवजी अनोळखी व्यक्तीने बनावट कागदपत्रांद्वारे लाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने पैसे लागल्याचा प्रकार समोर येताच शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून कागदपत्र मागवून अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच प्रांत अधिकारी आणि तलाठी यांनी मध्यवर्ती पोलिसांत तक्रार ताखल केली होती.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शनिवारी आणखी एक गुन्हा दाखल झाला असून, आतापर्यंत तीन गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. तर यात काही मोठे मासे अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्हासनगर प्रांत कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या नायब तहसीलदाराला रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
बेरोजगार कामगारांना बनवले बोगस शेतकरी
पुण्यामधून काही बेरोजगार शेतकऱ्यांना घेऊन या पाच जणांच्या टोळीने बनावट कागदपत्र तयार करून पैसे लाटले आहेत. पोलिसांनी यामध्ये २५ जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच जण हे मुख्य आरोपी असून २० जण हे बोगस शेतकरी आहेत.
भाजप आमदाराचा उपोषणचा इशारा
दरम्यान यासर्व प्रकरणावरून भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत. "कुशिवली धरणामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी आमचा वारंवार पाठपुरावा सुरु आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. तत्कालिन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी हा मोबदला वाटप करताना कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप करत भ्रष्टाचार केला असून त्यांना पहिले अटक झाली पाहीजे". अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.
"धरण घोटाळ्यात शिवसेनेचे नेते तसेच राष्ट्रवादी सरपंचाचे भाऊ आहेत. त्याचबरोबर अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारीही यामध्ये सामिल आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली नाही तर येत्या आठ दहा दिवसांत उप विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल" असा इशाराही आमदार गायकवाड यांनी दिला आहे. तर गिरासे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत हे निव्वळ राजकीय आरोप असल्याचं म्हटलंय. तसंच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.