
दिवा : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि जुन्या मुंबई पुणे महार्गावरील दहिसर (Dahisar) ते शिळफाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे तब्बल ३२ नैसर्गिक नाले बंद झाले असल्याने नाल्यांमधील पाणी हे महामार्गावर येऊन साचते आणि त्यामुळे अपघात होत असतात. या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पाहणी करून या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती.
हे देखील पहा :
या नंतर बुधवारी ठाणे (Thane) तहसीलदार युवराज बांगर यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली होती. यानंतर शनिवारी मनसेचे आमदार राजू पाटील, ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली असून लवकरच कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे. जुन्या मुंबई-पुणे (Mumbai-Pune) महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या अतिक्रमणांवर आता हातोडा पडणार आहे. दहिसर ते शिळ फाटा दरम्यान असलेल्या ३२ नैसर्गिक नाल्यांचे पुनर्जिवीकरण करण्याचा निश्चय आमदार राजू पाटील यांनी केला आहे.
नैसर्गिक नाले बंद असल्याने नाल्यांमधील पाणी हे पावसाळ्यात महामार्गावर येऊन अपघात घडत आहेत. तर, भंगार माफियांकडून रासायनिक पाणी हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नाल्या सोडले जाते. यामुळे १४ गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच हे रसायन मिश्रित पाणी १४ गावांमध्ये जात असल्याने विहिरी आणि बोअरवेलच पाणी देखील प्रदूषित झाले आहे. त्यामुळे १४ गावांची प्रदूषणामधून मुक्तता आणि वाहनचालकांची अपघातांच्या गर्तेतून मुक्तता करण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, एमएमआरडीए चे, एमएसआरडीसी अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, आयआरबी कंपनीचे अधिकारी यांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मनसेचे जिल्हा अध्यक्ष हर्षद पाटील, विभाग अध्यक्ष शरद पाटील, शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील अन्य जणांच्या उपस्थितीत शनिवारी महामार्गावरील समस्या या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. लवकरच महामार्गावरील अतिक्रमण (Encroachment) दूर करण्याचं आश्वासन तहसीलदार युवराज बांगर यांनी दिलं आहे.
कल्याण शिळ मार्गावरील अतिक्रमणांचा देखील पाठपुरावा सुरु...
कल्याण शिळ रोडवरील वाहतूक कोंडीस अडथळा ठरत असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेल्या बैठकीत देखील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा प्रश्न आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला होता. वाहतूक कोंडी होत असल्याने आणि शासनाच्या कामात अडथळा ठरत असलेली बांधकामे तोडण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.