बीड : बीडमध्ये एका शाळकरी मुलाने बनवलेल्या अनोख्या चाकूची चांगलीच चर्चा रंगलीय. कांदा चिरताना आपल्या आईच्या डोळ्यातून येणारे पाणी पहावले नाही म्हणून, एका सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने, आपल्या कल्पक बुद्धीने स्मार्ट चाकू (Smart Knife) तयार केलाय. त्यामुळे या विद्यार्थ्याची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
बीडच्या (Beed) कुर्ला गावच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत, विज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या ओंकार शिंदे या विद्यार्थ्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत होऊ लागलीय. त्याला कारणही तसंच आहे. "कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि इथून त्याला कल्पना सुचली. आपल्या कल्पक बुद्धीने ओंकारने एका अनोख्या चाकूची निर्मिती केलीय. 7 दिवसात ओंकारने हा स्मार्ट चाकू बनवलाय,
आपल्या आईच्या डोळ्यातील पाणी पाहून अनोखा चाकू तयार करणाऱ्या, ओंकार शिंदे याचे आई वडील, हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आपल्याला शिकता आलं नाही म्हणून, हे शिंदे दाम्पत्य शेतात राबून ओंकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. अखेर मुलाची पंचक्रोशीत होणारी चर्चा पाहून ओमकारच्या शेतकरी आई-वडिलांना देखील आनंद होतोय.
कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते?
कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणे हि सामान्य बाब आहे. मात्र, त्यामागे असणारे शास्त्रीय कारण जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. कांद्यामध्ये काही गंधसंयुक्ते (Aroma Compounds) त्याचसोबत विकरे (Enzymes) देखील सुद्धा असतात. मात्र, जो पर्यंत आपण कांदा कापत नाहीत तो पर्यंत संयुगे आणि विकरे हे यांच्यात रासायनिक क्रिया घडून येत नाही.
आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा या गंधसंयुगांचे रुपांतर ऍसिडमध्ये होते आणि एन्झाइम्सचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन बाष्पनशील असते. त्याचे रुपांतर वायूत होऊन ते थेट आपल्या डोळ्यात शिरते. याच वायूची आपल्या डोळ्यातील पाण्यासोबत रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रुपांतर सलफ्युरिक ऍसिडमध्ये होते व डोळ्यातून पाणी येते.
याच गोष्टीला अनुसरून ओंकारने या अनोख्या चाकूची निर्मिती केली आहे. कांदा चिरताना त्यातून निघणारा वायू डोळ्यात जाऊन डोळ्यातून पाणी येऊन नये म्हणून त्याने खासपद्धतीने चाकूच्या समोर एक छोटासा पंखा बसवला आहे. कांदा चिरतेवेळी हा छोटासा पंखा सुरु केल्यानंतर कांद्यातून निघणारा वायू डोळ्यात जात नाही.
अनोखे प्रयोग करणाऱ्या ओंकारला, असे नव नवे प्रयोग करण्याची प्रेरणा त्याच्या शिक्षकाकडून मिळालीय. शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे, त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वी देखील त्यांनी विद्यार्थ्यांकडून असे प्रयोग करून घेतले होते. मात्र ओंकारच्या या प्रयोगाने त्यांची देखील चर्चा होऊ लागलीय.
दरम्यान आजकाल व्यसनाधीनतेकडे वळालेल्या तरुणाईकडून, ऐशो आरामाचं जीवन जगण्यासाठी, आई वडिलांकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढत आहे. मात्र दुसरीकडे आपल्या आईच्या डोळ्यात येणारं पाणी थांबावं, यासाठी अवघ्या 12 वर्षाच्या वयातील ओंकार याने, आपल्या बुद्धीच्या जोरावर अनोख्या चाकूची निर्मिती केलीय. त्यामुळं ओमकारसह त्याच्या चाकूची बीड जिल्ह्यातील पंचक्रोशीत चर्चा रंगलीय. त्यामुळं या लहानग्याच्या आदर्श इतरांनीही घ्यायला हवा. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.