डोंबिवली : कल्याण ग्रामीण भागातील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने काही दिवसांपूर्वी कारवाई केली. ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कारवाईनंतर बिल्डर मुन्ना सिंग याने केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. इमारतीवर कारवाई करू नये म्हणून अधिकाऱ्यांनी वारंवार पैसे उकळले असं सिंग यांनी सांगितले, तर काही दिवसापूर्वीच एका हॉटेलमध्ये बिल्डर सिंग यांच्यासोबत केडीएमसी अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली.
या बैठकीचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले. याच प्रकरणात बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा अशी मागणी ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त यांच्याकडे केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत आयुक्त पदावरुन दूर करा अशी मागणी करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले. दरम्यान, बिल्डर मुन्ना सिंग यानेही या प्रकरणाची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली आहे. या प्रकरणात स्वत: आयुक्त सामिल असल्याने काही ठोस कारवाई केली जात नाही असा आरोप बिल्डर मुन्ना सिंग याने केला आहे.
हे देखील पहा :
काही दिवसापूर्वी कल्याण ग्रामीण भागातील दावडी परिसरात असलेली बेकायदा सहा मजली इमारत केडीएमसीने पाडली. ही इमारत न पाडण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप बिल्डर मुन्ना सिंग यांनी केला होता. इमारत पाडण्यापूर्वी अधिकारी दीपक शिंदे आणि अनंत कदम यांनी प्रत्येकी एक लाख रुपये स्वत: साठी घेतले. तसेच आयुक्तांच्या नावे 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप करीत बिल्डरने अधिकाऱ्यासोबत हॉटेलमध्ये चर्चा करीत असल्याचे एक सीसीटीव्ही सादर केले आणि एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आरोपांची चौकशी करण्यासाठी अप्पर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्या समितीने सिंग यांना सुनावणी पाठवली असून 17 सप्टेंबर पर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. चौकशीत काही तथ्य आढळल्यास निश्चित दोषींवर कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकामावर सुरू असलेली कारवाई शिथिल व्हावी म्हणून असे खोटेनाटे आरोप समाजकंटक करीत आहेत. बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरु राहणार आहे. कारवाई टाळण्यासाठी असे आरोप केले जातात. आतापर्यंत गेल्या दीड वर्षात 620 बेकायदा इमारतींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. असे आयुक्तांनी सांगितले असून त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited By : Krushnarav Sathe
हेही वाचा :
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.