Cm Eknath Shinde On Thane - Borivali Tunnel: बोरिवली टनेलला मंजुरी दिली असून येत्या काही काळात ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य होणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या ओवळा माजीवाडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते आहे. रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत आहे.'' (Latest Marathi News)
शिंदे म्हणाले की, वाहतूक कोंडीतून ठाणे शहराला मुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. निरोगी शहर उभे करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे. आपल्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजेत. मुलांमध्ये कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्यासपीठ देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे.
विकासाची ही कामे जनतेच्या पैशातून होत आहेत. त्यामुळे त्यात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होता कामा नये. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामे सुरू आहेत. तसेच संपूर्ण ठाणे व मुंबई महानगर प्रदेशात क्लस्टर प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या सोहळ्यात स्पष्ट केले.
रस्ते रुंद आणि चांगले असल्यास त्या शहराची वेगाने प्रगती होते. त्यामुळे सरकारने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक आदी प्रकल्पांना चालना दिली. लवकरच नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे ठाणेपर्यंतचे काम पूर्ण होणार आहे. हा मार्ग संपूर्ण पर्यावरण पूरक आहे. या सरकारने लोकहिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतले आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.