जयश्री मोरे, मुंबई
Mumbai News: राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यातील वाद चांगलाच वाढत चालला आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना निशाण्यावर धरले आहे. 'शरद पवार यांनी डबल गेम केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील फडणवीसांना काल प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन फडणवीसांना धारेवर धरले आहे. 'शरद पवारांचे एकाच वेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला १०० जन्म घ्यावे लागतील.', अशी प्रतिक्रिया संजय राऊतांना दिली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'शरद पवारांनी जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे. त्यावेळी राष्ट्रपती राजवट कधी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. तिन्ही पक्षांचे एक मत होतं की बहुमताचा आकडा सिद्ध केला तरीही राज्यपाल बहुमत मानणार नाही.
राज्यपाल आपल्याला झुलवत ठेवतील बहुमत मान्य करणार नाही. एका भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठविली गेली आणि महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला. ही शरद पवार यांची गुगली आणि सिक्सर दोन्ही होते.', असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसंच, 'शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला 100 जन्म घ्यावे लागतील हे मी आजही सांगतो. पवारांनी गुगली टाकली नसती तर राष्ट्रपती राजवट संपली नसती आणि वेगळे खोके सरकार निर्माण झालं असतं. शरद पवारांच्या त्या गुगलीने देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष क्लीन बोल्ड झाला.फडणवीसांची विकेट गेल्याने गेल्या तीन वर्षांपासून ते रडत आहेत. त्या झटक्यातून ते बाहेर पडले नाहीत.', अशी टीका त्यांनी केली.
संजय राऊत यांनी पुढे असे सांगितले, 'आम्ही त्या सरकारकडे सरकार म्हणून पाहतच नाही. महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झाले. शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसण्याला एक वर्ष झाली. उचापती करून घटनाबाह्य सरकार स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष झाली. सकस फक्त चाळीस आमदार झाले.' तसंच, 'राज्य अनेक संघर्षातून जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेपासून बेरोजगारीपर्यंत अनेक प्रश्न आहेत. या राज्यातील महिला अजिबात सुरक्षित नाही. फसवणुकीची जयंती पुढल्या वेळेला फसवणुकीची पुण्यतिथी असेल.', असे देखील ते म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.