मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं आज निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा समूहाकडून टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. टाटा यांच्या निधनाने आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. माझ्यासाठी ते मित्र मेंटॉर आणि गाईड होते. माझे प्रेरणास्त्रोत होते, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखरन यांनी दिली.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी सायंकाळी मुंबईत निधन झालं. रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उद्योगपती रतन टाटा यांची बुधवारी सांयकाळी तब्येत बिघडल्याचं वृत्त हाती आलं होतं. त्यानंतर काही तासांनी उद्योगपती रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या मृत्यूने देश शोकसागरात बुडाला आहे. टाटा ग्रुपला व्यवसायात यश मिळवून देण्यास रतन टाटा यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी देशासाठी आणि सर्वसामान्यांसाठी केलेलं कार्य सदैव आठवणीत राहणारं आहे. रतन टाटा देशाला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे.
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. 'रतन टाटा हे प्रामाणिक, नैतिक लीडरशिप आणि परोपकाराचा आदर्श होते. ते आमच्या आठवणीत सदैव राहतील,असे गोयंका म्हणाले.
दरम्यान, रतन टाटा वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे १९९१ साली ऑटो ते स्टीलशी संबंधित समूह आणि टाटा समूहाचे चेअरमॅन झाले होते. चेअरमॅन झाल्यावर रतन टाटा यांनी टाटा ग्रुपला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी २०१२ सालापर्यंत टाटा समूहाचं नेतृत्व केलं. १९९६ साली टाटा यांनी टेलीकॉम कंपनी टाटा टेलीसर्व्हिसेजची स्थापना केली होती. तर २००४ साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसज बाजारात लिस्ट झाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.