बदलापूर: सेवानिवृत्तीनंतरच्या काळात अनेकजण आपल्या आवडीचा छंद जोपासून त्यातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात. बदलापूरात राहणारे आनंद पवार हे एक वृद्ध कलावंत मात्र आपल्या लाकडी कलाकुसरीतून उदर निर्वाहासाठी धडपड करत आहेत. (Struggling for subsistence from wooden crafts; The unbroken sadhana of the old artist from badlapur)
हे देखील पहा -
वय वर्ष ७५ असलेले आनंद पवार, हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होते. ती करीत असताना फावल्या वेळेत ते लाकडी कलाकुसरीच्या वस्तू बनवीत. मात्र आता तोच छंद आता त्यांच्या उतारवयात जगण्याचा आधार ठरला. साग, शिसे, चंदन, देवनार आदी प्रकारच्या लाकडांपासून ते या वस्तू बनवितात. पटाशी, हातोडी, कानस याचा वापर करून बहुमजली जहाज, रथ, लहान-मोठी घरे, निरनिराळे पक्षी, प्राणी त्यांनी तयार केले आहेत, मात्र आज आनंद पवार यांना ते करीत असलेल्या लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंमधून आनंदापेक्षा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे हवे आहेत.
बदलापुरात एका भाड्याच्या घरात मानसिकदृष्ट्या आजारी असलेला मुलगा आणि पत्नीसोबत राहणाऱ्या या वृद्ध कलावंतांनी गेल्या काही वर्षात शेकडो लाकडी कलाकृती बनवल्या. परंतु त्याचे योग्य मूल्य त्यांना कधी मिळाले नाही. मात्र अर्थार्जनासाठी त्यांना त्या कवडीमोल भावाने विकाव्या लागल्या. त्यांच्या पत्नी माया पवारही चित्रकार असूनही त्याही घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून या लाकडी कलाकृती बनविण्याच्या कामात त्यांना मदत करतात. अक्षरश: रस्त्यावर बसून त्यांनी या कलाकृती विकल्या. यात स्वाभिमान जपण्यासाठी सुरू असलेल्या या अखंड धडपडीचा योग्य तो सन्मान व्हावा, अशीच या वृद्ध कलावंतांची अपेक्षा आहे.
हाती असलेल्या कलेचा वापर करून चार पैसे तरी संसारासाठी मिळवावेत, म्हणून आनंद पवार सतत लाकडी कलाकुसरीच्या वस्तू बनवितात. लहान-मोठ्या शेकडो वस्तू त्यांच्या घरात आहेत. बदलापूर शहरात अगदी कवडीमोल भावात आतापर्यंत त्यांनी या वस्तू विकल्या आहेत. त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून मुलावर उपचार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.