उल्हासनगर : शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे या दोन गटात संघर्ष पाहायला मिळाला होता. ठाकरे यांचे समर्थक एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. अशातच उल्हासनगरचे शिवसेना (Shivsena) शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह १७ ते १८ जणांविरोधात उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ekanath Shinde News)
२५ जून रोजी उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली होती. ही तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांची उल्हासनगर पोलिसांनी धरपकड केल्यानंतर शिवसैनिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याबाहेर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, विभागप्रमुख शिवाजी जावळे, भगवान मोहिते, आदेश पाटील, ज्ञानेश्वर मरसाळे, महेंद्र पाटील यांच्यासह १७ ते १८ जणांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Shivsena Latest News)
शिंदे समर्थक शिवसैनिक सागर उटवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
राजेंद्र चौधरी हे दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्यानं सत्तासंघर्ष संपल्यानंतर आता संघटनेत अंतर्गत संघर्ष सुरू होण्याची चिन्हं आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.