नितीन पाटणकर, ता. ३ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पुण्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाची बुलंद तोफ सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पक्षासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी पुण्यातील तीन विधानसभेच्या जागांवर दावाही ठोकला आहे.
"भाजपला भासायला लागली आहे मतांची कडकी, म्हणुन सत्ताधाऱ्यांना आठवलीय बहीण लाडकी. मुख्यमंत्र्यांच्या काही बहीणी अतिशय लाडक्या आहेत. पुजा खेडकर त्यांची लाडकी बहीण आहे. कारण तिला दिव्यांग प्रमाणपत्र शिंदे सरकारच्या काळात मिळाले. लाडके मेहूणे, दाजी उपाशी असताना बहिणींना मात्र १५०० रुपये देण्याची घोषणा केली," असे म्हणत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
तसेच "मला प्रामणिकपणे सांगू वाटतं की, आमच्या काही जागा आतातरी प्रेमापोटी जाऊ नयेत. यावेळेला तरी त्या जागा आम्हाला अन् आम्हालाच मिळायला हव्यात. आम्हाला पुण्यातील हडपसरची जागा, वडगाव शेरीची जागा, कोथरुडची जागा आम्हाला मिळायला हव्यात. आम्ही हक्काने आपल्याकडे विनंती करतोय. पुणेकरांच्या वतीने ही मागणी ठेवणे गरजेचे आहे," असे म्हणत त्यांनी तीन जागांवर दावा ठोकला आहे.
"अमित शहा हे तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला कायदा शिकवण्याची गरज नाही. अचानक फडणवीसांवर आरोप होत असताना सचिन वाझे एकदम लेटर बॅांब कसा का टाकतो? वाझेंना हे सर्व आताच का आठवले.? एवढे दिवस ते का गप्प बसले? नवाब मलिक, संजय राऊत , अनिल देशमुख यांना कधी अटक केल्यावर माध्यमांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. मग, ती वाझे यांनाच आणि आताच कशी मिळाली," असे खोचक सवालही अंधारे यांनी उपस्थित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.