Shivsena Dasara Melava : विजयादशमीच्या संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होणार आहे. या दसरा मेळाव्याला आता अवघे काही तासच शिल्लक उरले आहेत. दसरा मेळाव्यानिमित्त (Dasara Melava) राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे. (Shivaji Park Dasara Melava Vehicles Parking)
अशी असेल शिवतीर्थावरील पार्किंगची व्यवस्था
दादरच्या शिवतीर्थ येथील दसरा मेळाव्यास पश्चिम व उत्तर उपनगरातून बसमधून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम व कामगार मैदान परळ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तर कार पार्किंगसाठी इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर-१, कोहिनूर स्क्वेअर येथे व्यवस्था केली आहे.
त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या बस पार्किंगसाठी पाच उद्यान माटुंगा, नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड, आर ए के रोड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पार्किंगची ही व्यवस्था जाहीर केली आहे.
दसरा मेळाव्यासाठी गर्दीची स्पर्धा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याची अहमहमिका सुरू आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना मुंबईत आणण्याची स्पर्धा सुरू आहे.
लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सहा हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे. इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.