Andheri By-Poll : अंंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा ते भाजपची माघार... दोन आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या निवडणुकीचा संपूर्ण घटनाक्रम

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कालपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
BJP-Shivsena
BJP-ShivsenaSaam Tv
Published On

>> प्रविण वाकचौरे

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु होत्या. राज्याच्या तापलेल्या वातावरणात अंधेरी पोटनिवडणुकीमुळे आणखीच भर पडली होती. शिवसेनेचा ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांनी अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही बाजूने जोरदार तयारीही सुरु होती. मात्र ऐनवेळी भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कालपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या, ज्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाचा मुद्दा

निवडणूक आयोगाने (Election Commission) अंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर या रणसंग्रामात उमेदवार कोण असेल यापेक्षा निवडणुकीत फूट पडलेल्या शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाचा मुद्दा पुढे आला. निवडणुकीआधी हा पेच सोडवणे महत्त्वाचे होते. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला. त्यामुळे आपल्या पसंतीचं नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून चढाओढ सुरु झाली. अखेर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

BJP-Shivsena
Andheri By-Poll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; राज ठाकरे, शरद पवारांच्या आवाहनानंतर एका रात्रीत असं काय घडलं?

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गटाची हायकोर्ट धाव

नाव आणि चिन्हाचा पेच सुटल्यानंतर निवडणुकीचे उमेदवार कोण असतील असा मुद्दा होता. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र त्यांच्या मुंबई महापालिकेतील नोकरीच्या राजीनाम्यामुळे अडचण निर्माण झाली. मुंबई महापालिकेने तांत्रिक मुद्दा उपस्थित करत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जातो की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मुंबई महापालिकेला आव्हान दिलं. तिथेच पहिली लढाई जिंकत ठाकरे गटाने बाजी मारली. मुंबई उच्च न्यायालयाने उमेदवारी दाखल करण्याच्या आदल्या दिवशी बीएमसीला ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आणि त्या 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाच्या अधिकृत उमेदवार ठरल्या.

शिंदे गटाकडून ऋतुजा लटकेंवर दबाव

दरम्यान ऋतुजा लटके नेमक्या ठाकरे गटाकडून की शिंदे गटाकडून निवडणूक लढणार याबाबतही वावड्या उढल्या होत्या. ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. तसेच त्यांना मंत्रिपदाची ऑफरही असल्याची चर्चा होती. मात्र ऋतुजा लटके यांनी मी सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचं सांगितलं आणि शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला.

BJP-Shivsena
Grampanchayat Election Result 2022 : 'मविआ' समाेर शिंदे गटाच्या मंत्र्याचा गड ढासळला

शिंदे गट की भाजप?

आता शिंदे गट आणि भाजपकडून नेमकी निवडणूक कोण लढणार याबाबतही विविध चर्चा समोर आल्या. ठाकरे आणि शिंदे गट थेट समोरासमोर या निवडणुकीत येणार असंही बोललं जात होतं. यासाठी भाजप आपली जागा सोडून शिंदे गटाला येथे पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी घोषित केली आणि निवडणूक भाजपच लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं.

आता निवडणुकीचा प्रचार सुरु होणार, सभा, मेळावे सुरु होणार असं वाटत असाताना मोठा ट्विस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका पत्रामुळे निर्माण झाला. काल राज ठाकरे यांनी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या आमदार झाल्या तर, रमेश यांच्या आत्म्याला शांती मिळेल. भाजपने ही निवडणूक लढवू नये आणि लटके यांच्या पत्नी आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती आहे, असं राज ठाकरे यांनी केली होती.

तर सायंकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील पत्रकार परिषद घेत अंधेरी पोटनिवडणून प्रतिष्ठेची न करण्याचं आवाहन केलं. निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. जेणेकरुन महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराचा कालावधी अवघा दीड वर्ष आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची करु नये. तसेच रमेश लटके यांचं योगदान पाहता निवडणूक बिनविरोध करून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून आणणे योग्य राहील. यामुळे योग्य संदेश जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

दोन बड्या नेत्यांच्या आवाहनानंतर रात्रीच भाजपची सूत्रं हालली आणि बैठकांचा सिलसिला सुरु झाला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री बैठक झाली. भाजपचे वरिष्ठ नेतेही यात सहभागी होता. त्यानंतर आज सकाळी देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com