जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. यामध्ये आंदोलक महिलांसह अनेकजण जखमी झाले. या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असून ठिकठिकाण सरकारविरोधात आंदोलनं केली जात आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षांनी देखील शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं असून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
महाराष्ट्रातील मराठा, धनगर व अन्य काही समाज सातत्याने आरक्षणासाठी आंदोलने करत आहेत. मराठा समाजाने तर शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढले. एक ठिणगी कुठे पडली असती तर वणवा पेटायला वेळ लागला नसता".
"मराठा आंदोलक (Maratha Reservation) सदैव संयम बाळगूनच आंदोलने करत असताना आंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले? आंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? याचा छडा लागलाच पाहिजे", असा सवाल सामना अग्रलेखातून सरकारला करण्यात आला आहे.
"मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या न्याय्य मागणीची तड तर लागत नाहीच; पण या मुद्दय़ावरून आंदोलन करणाऱ्यांवर अमानुष लाठीहल्ला व गोळीबार करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे राक्षसी कृत्य राज्यातील मिंधे-फडणवीसांच्या ट्रिपल इंजिन सरकारने केले आहे", अशी टीकाही सामना अग्रलेखातून शिंदे सरकारवर करण्यात आली आहे.
"जालना जिल्हय़ातील (Jalna News) आंतरवाली सराटी या गावात जे घडले ते चीड आणणारे आहे. अतिरेकी वा नक्षलवाद्यांवर हल्ला चढवावा अशा पद्धतीने पोलिसांनी चहुबाजूने घेरून मराठा आंदोलकांवर अमानुष हल्ला चढवला. पोलिसांनी केलेला लाठीहल्ला इतका बेछूट होता की, आपण निरपराध महिला, मुले व वयोवृद्धांची डोकी फोडतोय, याचेही भान पोलिसांना राहिले नाही".
"स्वातंत्र्यलढय़ात अमृतसरमध्ये ब्रिटिशांनी जसे जालियनवाला बागेचे हत्याकांड घडवले, त्याच घटनेची आठवण व्हावी असा हा राक्षसी हल्ला होता. आंदोलनाच्या चार दिवसांत आंतरवाली गावात एकदाही अनुचित प्रकार घडला नव्हता. सारे काही लोकशाही मार्गाने व शांततेने सुरू असताना हे आंदोलन उधळून लावण्यासाठी सरकारने राक्षसी बळाचा वापर करण्याचे कारणच काय?" असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
" ‘शासन आपल्या दारी’ हा मिंधे सरकारचा भंपक कार्यक्रम येत्या 8 तारखेला जालना येथे होणार आहे. त्या कार्यक्रमात आंतरवाली सराटीच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद उमटू नयेत, म्हणून शांततेने सुरू असलेले हे आंदोलन चिरडण्याचा निर्णय सरकार पातळीवर झाला आणि तसे निर्देश फडणवीसांच्या गृहखात्याने पोलीस यंत्रणेला दिले", असा आरोपही सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.