"दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सुमारे 50 हजार कोटींच्या ‘पॅकेज’ची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. एकीकडे दुष्काळ, नापिकी, त्यातून उद्भवलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा हे राज्यावरील एक गंभीर संकटच आहे", अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून शिंदे सरकारवर करण्यात आली. (Latest Marathi News)
"दिल्लीश्वरांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट कायमचे दूर कर, अशीच प्रार्थना राज्यातील जनता आज श्रीचरणी करीत असेल. केंद्रातील ‘स्वयंघोषित’ राजकर्त्यांबाबतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापासून रोजगारनिर्मितीपर्यंत, धर्मापासून विकासापर्यंत, देशाच्या संरक्षणापासून तथाकथित आत्मनिर्भरतेपर्यंत फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगे हवेत सोडले जात आहेत"
"राज्याराज्यांत जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाचे उद्योग सुरू आहेत. त्यातून दंगली पेटवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळय़ा भाजण्याचे सत्तापक्षाचे इरादे आहेत. महागाई, बेरोजगारी आणि इतर संकटांनी गांगरलेल्या देशवासीयांना धर्म आणि श्रद्धेच्या गुंगीत गुंतविण्याचे कारस्थान सुरू आहे", असा गंभीर आरोपही सामना अग्रलेखातून करण्यात आला.
"अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून समान नागरी कायदा, ‘एक देश – एक निवडणूक’ अशा अनेक गोष्टींची ‘हूल’ दिली जात आहे. चार महिन्यांपासून पेटलेल्या मणिपूरबाबत सोयिस्कर मौन बाळगायचे आणि दुसरीकडे संसदेच्या सुरक्षा रक्षकांच्या डोळय़ावर ‘मणिपुरी’ टोपी ठेवून मणिपुरी अस्मितेचा कळवळा दाखवायचा", अशी टीकाही सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली.
"विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ 2024मध्ये आपला सफाया करणार याची जाणीव झालेले राज्यकर्ते आणि त्यांचे भक्त यांना ‘इंडिया नव्हे भारत’ची उचकी लागली आहे. ‘हूल’ आणि ‘भूल’ ही सध्याच्या राज्यकर्त्यांची प्रमुख शस्त्र आहेत. त्यांचा वापर करीत जनतेला एका वेगळ्याच भुलभुलैयात ठेवण्याचा उद्योग नऊ वर्षांपासून सुरू आहे. 2024 साठीही त्यांचा तोच प्रयत्न आहे", अशी टीका सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर करण्यात आळी.
"नऊ वर्षांच्या सत्तेने आपल्याला फक्त ‘कळा’च दिल्या, हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे 2024मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचेच, असा निश्चय जनतेने मनाशी केलाच आहे. ‘गणराया, देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!’ अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्तदेखील आज घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांच्या चरणी करीत असतील", असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.