उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान देत आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं. या पार्श्वभूमीवर आज अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार कोल्हे यांनी ट्वीट केलं आहे.
"आजच्या दिवसाची सुरुवात संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्र व देशाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या लोकनेत्याला भेटून....!" असं अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"आज देशाचे नेते आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि उद्या दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या दरम्यान होणाऱ्या किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे "शेतकरी आक्रोश मोर्चा" च्या तयारीबद्दल माहिती दिली".
"आदरणीय शरद पवार साहेबांचं धोरण हे कायमच शेतकरी हिताचं असतं, म्हणूनच त्यांना मायबाप जनता ' शेतकऱ्यांचा कैवारी ' म्हणून ओळखते! या शेतकरी आक्रोश मोर्चा बद्दल त्यांचं याआधी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं. आजची त्यांची भेट शेतकऱ्यांसाठी आणखी जोमाने लढण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारी होती", असंही अमोल कोल्हे (Amol Kolhe) आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. मी राजीनामा देण्याबाबात अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी झालेली चर्चा खाजगी स्वरुपाची चर्चा होती. खाजगी चर्चा जाहीर करायची नसती. पण , त्यामागचे संदर्भ, परिस्थिती वेगळी होती. ती देखील बाहेर यायला हवी, असंही कोल्हे म्हणाले.
"शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुसंस्कृत राजकारण करणार आहे. मी आहे तिथेच आहे, मात्र ज्यांनी भूमिका बदलली त्यांनी ती का बदलली याचा विचार करणं गरजेचं आहे," अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.